प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावावर ‘बार्टी’कडून काही संस्थांना आर्थिक लाभ!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर काही प्रशिक्षण संस्थांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

‘संबोधी अकादमी’वर कृपादृष्टी

देवेश गोंडाणे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर काही प्रशिक्षण संस्थांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बार्टीने लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्टय़ा मोठय़ा असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच प्रशिक्षण केंद्र दिले असताना ‘संबोधी अकादमी’ संचालित प्रशिक्षण केंद्राला औरंगाबाद, हिंगोली आणि परभणी अशा तीन जिल्ह्यांमध्ये केंद्र दिले आहेत. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यांमध्ये एकही केंद्र नाही तर या तीन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तीन संस्थांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आल्याने ‘बार्टी’च्या एकंदरित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

‘संबोधी’ अकादमी  संचालकांच्या राजकीय संबंधामुळे ‘बार्टी’ने त्यांना आर्थिक लाभ पोहचवण्यासाठी याआधीही नियमबाह्य पद्धतीने प्रशिक्षण केंद्र दिल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे. संबोधी अकादमीची  दरवषीची कामगिरी न तपासता  थेट पाच वर्षांसाठी राज्य सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. यासाठी संभाव्य खर्च २४ कोटी १० लाख रुपये इतका दाख्वण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. ‘बार्टी’च्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी आदी व तत्सम क्षेत्रात नोकरीच्या संधी तसेच, मुलाखतीवर आधरित खासगी व कार्पोरेट क्षेत्रातील चांगल्या नोकरीच्या संधींकरिता पूर्वतयारी प्रशिक्षण दिले जाते. या नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ‘बार्टी’ने काही जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण संस्थांची निवड केली आहे.

यासंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करून या प्रशिक्षण संस्थेमध्ये पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन केले आहे. यामध्ये राज्यातील बहूतांश जिल्ह्यांचा समावेश असला तरी लातूर, नांदेड आणि सोलापूरमध्ये एकही प्रशिक्षण केंद्र नाही. विशेष म्हणजे, या तीनही जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांची मोठी संख्या असतानाही तेथे केंद्र का नाही,असा सवालही उपस्थित होत आहे.

दुसरीकडे ‘बार्टी’ने औरंगाबाद, हिंगोली आणि परभणी अशा तीन ठिकाणी संबोधी अकादमीला प्रशिक्षण केंद्रासाठी परवानगी दिली आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये अन्य संस्थांना प्रशिक्षण देण्यास परवानगी असतानाही एकाच संस्थेला अशा तीन जिल्ह्यात परवानगी कुठल्या आधारावर देण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

‘बार्टी’ काही खासगी संस्थांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते. ‘बार्टी’ला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना लाभ पोहचवायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्यात योजना राबवावी व एका संस्थेची मक्तेदारी बंद करावी.

अतुल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Benefits organizations training programs ysh

ताज्या बातम्या