गडचिरोली : विधसानसभा निवडणुकीसमोर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी बंड केले असून येत्या १२ सप्टेंबरला त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी दुजोरा दिला.
हेही वाचा >>> नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नागपुरात! वंदे भारत एक्सप्रेला…
६ सप्टेंबर रोजी आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ‘जनसन्मान’ यात्रा पार पडली. यावेळी अहेरी विधानसभेतून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावई ऋतुराज हलगेकर यांच्या बंडाविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली होती. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच भाग्यश्री आत्राम ९ सप्टेंबरला गडचिरोली येथे आल्या होत्या. त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांना बंडाबद्दल विचारले असता, येत्या १२ सप्टेंबरला मी सर्व प्रश्नांना उत्तर देणार असे सांगितले. अहेरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार असून खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>> Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
गेल्या काही महिन्यांपासून भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दरम्यान, ६ सप्टेंबररोजी जनसन्मान यात्रेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः मुलगी आणि जावई आपल्या विरोधात उभे राहणार असून शरद पवार यांच्यावर आपले घर फोडल्याचा आरोप केला. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा भाष्य करीत घरात फूट पडू देऊ नका, असा सल्ला भाग्यश्री आत्राम यांना दिला होता. त्यानंतर अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.
राजकीय कारकीर्द अशी…
भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. मंत्री आत्राम यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता स्थापन केली होती. दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम सभापती आणि आता त्या गोंडवाना विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत.
…. प्रतिक्रिया…..
घरात जे घडले, त्याबद्दल…
आमच्या घरात जे घडले याबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. जे काही सांगायचे आहे ते १२ सप्टेंबरला आपल्या सर्वांना माहिती होईल, असे भाग्यश्री आत्राम यांनी सांगितले.