गडचिरोली : शेजारील छत्तीसगड राज्यात आणि भामरागड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक दुर्गम गावांचा संपर्क प्रभावित झाला आहे. या पूरस्थितीत गंभीर आजारी असलेल्या तीन रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ही आपत्कालीन मदतकार्य मोहीम राबविली.

बिनागुंडा परिसरातील नदी-नाल्यांना पूर आल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत काल बिनागुंडा येथून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या संगीता चुक्कू उसेंडी या सात वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला आज लाहेरी येथून हेलिकॉप्टरने हेडरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. याशिवाय अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोन रुग्णांनाही पुढील उपचारांसाठी हेडरी येथे नेण्यात आले. यापैकी एका रुग्णाला सिकलसेलचा त्रास असल्याची माहिती आहे.

पूरस्थितीमुळे रस्ते मार्गाने रुग्णांना हलविण्यात अडथळे निर्माण होत असल्याने वैद्यकीय सेवेसाठी या भागात उपलब्ध असलेल्या लॉइड्स मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांच्या स्थलांतरासाठी आवश्यक नियोजन व समन्वय साधला.

रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुड्यामी हेही होते. पूरस्थितीमुळे दुर्गम भागातील वाहतूक ठप्प असताना प्रशासनाने तातडीने निर्णय घेत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रुग्णांना सुरक्षितपणे पुढील उपचारासाठी हलविल्याने त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.