नागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेला ताप चढला आहे. पीडितेला भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची सध्या मेडिकलमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीमुळे संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या विषयावर कुणीही अधिकृतपणे काहीही बोलायला तयार नाही.

पीडितेची प्रकृती दाखल होतानाच अत्यवस्थ असली तरी ती उपचाराला चांगला प्रतिसाद देत होती. डॉक्टरांच्या प्रयत्नाने ती धोक्याबाहेर येत असल्याचे संकेतही मिळत होते. परंतु, ही घटना उघड झाल्यावर पीडितेला भेटण्यासाठी राजकीय लोकांची गर्दी वाढायला लागली. अनेकांनी थेट वार्डात भेट दिली. आता या पीडितेला ताप आल्याची सूत्रांची माहिती आहे. औषधांनी तो नियंत्रणात आहे. परंतु निदान आतातरी हे ‘राजकीय पर्यटन’ थांबणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिंगणघाटमधील पीडितेलाही त्रास

हिंगणघाटमधील ज्या बालिकेवर चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेत अत्याचार झाला तीसुद्धा मेडिकलमध्येच दाखल आहे. तिला अतिसारसदृश्य त्रास सुरू झाला आहे. याबाबत मेडिकलच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रा. डॉ. वायकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आम्ही पत्रकारांना उत्तर देण्यास बांधील नाहीत. हा गोपनीय विषय असल्याने उपचाराबाबत काहीही बोलणार नाही.

 “आता पीडितेला कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नाही. परंतु कायद्याच्या दृष्टीने कुणाचे भेटणे गरचेचे असल्यास एक दोघांनाच भेटू दिले जाते. भेटणारा लांब रहावा म्हणून सुरक्षा रक्षकाला सोबत पाठवले जाते. सध्या दोन्ही पीडितेची प्रकृती स्थिर असून त्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे.”

– डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे व्यथा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी मेडिकल रुग्णालयात पीडितेची भेट घेतली. यावेळी डॉक्टरांसह अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी राजकीय नेत्यांचा त्रास होतो काय, हा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडून होकारार्थी उत्तर देऊन वार्डातील भेटीवर नियंत्रणासाठी राज्य महिला आयोगाने मदत करण्याची विनंती करण्यात आली.