भंडारा : लहान मुलांना घरात एकटे ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे हे भंडारा येथे घडलेल्या एका घटनेतून अधोरेखित झाले आहे.घरात कोणीही नसताना काच व लोखंडी खिडकीच्या मधोमध दोन लहान भावंडे अडकून पडल्याचा थरारक प्रसंग शनयानगर परिसरात घडला. शहरातील डी मार्टसमोरील आयएमए हॉलच्या मागे प्रा. रवी हलमारे यांच्या घरी ही घटना घडली.
७ वर्षांची रियांशी व ४ वर्षांचा श्रीयांश खिडकीत फसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही बालकांची सुखरूप सुटका करण्यात यश आल्याने आई-वडिलांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.माहितीनुसार, प्रा. रवी हलमारे यांच्या नवीन घराच्या बाजूला बांधकाम सुरू आहे. आईने दोन्ही मुलांना आतून दार बंद करून ठेवण्यास सांगून बाहेर गेली.
घरात खेळत असताना दोन्ही मुले खिडकीवर चढली व बाहेर डोकावण्याच्या प्रयत्नात काच व लोखंडी गज असलेल्या खिडकीच्या मधोमध अडकली.याच वेळी लहान मुलाने चुकून खिडकीची काच बंद केल्यामुळे दोघेही स्वतःहून अडकले. बाहेर पडू शकत नव्हते. काचेची खिडकी बाहेरून उघडावी लागत असल्याने त्यांना कोणतीही मदत करता येत नव्हती.
मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकताच शेजारील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले. घराला आतून कडी असल्याने दरवाजातून प्रवेश करणे अशक्य होते. सुरुवातीला नागरिकांनी खिडकीतून मुलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती गंभीर होत चालल्याने अखेर जेसीबी मशीन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय योग्य ठरला.
जेसीबीच्या साहायाने फोडली खिडकी…
जेसीबीच्या मदतीने घराच्या मागील बाजूची खिडकी अत्यंत सावधपणे फोडण्यात आली. घरात प्रवेश करून दोन्ही मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मुलांना मोठा मानसिक धक्का बसला होता. घटनेची माहिती मिळताच प्रा. रवी हलमारे व कुटुंबीय तातडीने घरी दाखल झाले. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे लहान मुलांना घरात एकटे ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

