भंडारा : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघाकडे आता ढुंकूनही पाहत नाहीत. निवडणुकीत केलेल्या विकासाच्या बाता आता हवेत विरल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे असे पालकमंत्री देखील भंडाऱ्याला पर्यटन स्थळ समजून केवळ भेट देऊन जातात. त्यामुळे सर्वच मतदारसंघांचा विकास रखडलेला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांच्या या उदासीन धोरणाच्या विरोधात आता संतप्त नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे.

जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायतीने पालकमंत्री पंकज भोयर व आमदार, खासदार यांचा बेपत्ता असल्याचे फलक लावले जो कोणी त्यांना शोधून देईल त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा तो सन्मान देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्मशानभूमी व इतर विकास कामांची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे मात्र प्रशासन व राजकीय पुढारी याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपोषण करत पालकमंत्री आमदार खासदार हे बेपत्ता झाल्याचे फलक लावलेले आहेत. मागणी पूर्ण न झाल्यास राज्यमार्ग बंद करण्याचा इशाराही सरपंच मनिषा खंडाईत, उपसरपंच प्रमोद भुते यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांच्या बाबतीत भंडारा जिल्हा कायमच कमनशिबी राहिला आहे. २०२४ मध्ये विजयकुमार गावित हे पालकमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अजय मेश्राम यांनी पालकमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. मात्र सावकारे यांचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ असून अत्यंत लांबचा असल्याने सावकारे भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी फारसे इच्छूक नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात फक्त झेंडा टू झेंडा म्हणजे १५ ऑगस्ट आणि १६ जानेवारीला ते यायचे. त्यामुळे भंडाऱ्यात त्यांची ओळख झेंडा मंत्री अशी होती. आता २०२६ मध्ये आलेले पालकमंत्री पंकज भोयर हे देखील त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.