भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रियेनंतर एका मातेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी समोर आली आहे. या घटनेमुळे नवजात बालकाने जन्मताच आईचे छत्र गमावले असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकीकडे नवीन पाहुणा घरी येणार म्हणून शिवनकर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीने घात केला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील एका विवाहित महिलेचा सिजेरियन शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने नवजात बाळ सुरक्षित असले तरी, जन्माला येताच त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील पूजा निकेश शिवनकर यांना २३ फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी सिजेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच पूजा यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून डॉक्टरांनी २६ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता त्यांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, नागपूर येथे उपचार सुरू असतानाच पूजा यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

पूजा यांचे पती निकेश शिवनकर यांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा थेट आरोप केला आहे. “माझ्या पत्नीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे,” असे सांगतानाच, प्रसूतीशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे आणि फाईल मागितली असता रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी केला आहे. यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर संशयाची सुई निर्माण झाली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने खासदार प्रशांत पडोळे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जे अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गावावर शोककळा.. .

मृत पूजा यांच्यावर मासळ येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या काही दिवसांच्या बाळाला आईविना पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.