भंडारा : उत्सवाच्या जल्लोषाच्या नावाखाली कानठळ्या बसविणाऱ्या डीजे-डॉल्बीच्या दणदणाटाला अखेर लगाम बसला आहे. आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात डॉल्बी, प्लाझ्मा साऊंड, प्रीमियम साऊंड सिस्टीम आणि तत्सम ध्वनीप्रणालींच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सावन कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली ध्वनीप्रदूषणाचा उच्छाद मांडणाऱ्यांना हा निर्णय चांगलाच चाप बसविणारा ठरणार आहे.
दहीहंडी, पोळा, तान्हापोळा, ताजीयाबाबा छब्बीसवी, गणेशोत्सव, गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव मंडळांचे कार्यक्रम तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील ध्वनीप्रणालींचा वापर वाढण्याची शक्यता असते. यामुळे ध्वनीप्रदूषणासोबतच नागरिकांना होणारा त्रास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
वाहनांवरही डीजेला ‘नो एंट्री’
अधिसूचनेनुसार डॉल्बी साऊंडमधील टॉप, मिड, बेस आदी मल्टीस्पीकर, प्लाझ्मा साऊंड सिस्टीम, प्रीमियम साऊंड सिस्टीम तसेच तत्सम ध्वनीप्रणाली वाहनांवर वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर अशा ध्वनीप्रणाली बसविण्यासाठी वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मिरवणुकीत ध्वनीचा ‘दणका’ देण्यासाठी वाहनांचे रूपांतर करणाऱ्यांवरही प्रशासनाची नजर राहणार आहे.
दोन महिने आदेश लागू
हा आदेश ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे आगामी जवळपास दोन महिन्यांच्या उत्सवी कालावधीत डीजे-डॉल्बीच्या वापराबाबत मंडळे, आयोजक आणि वाहनधारकांना प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
ध्वनीमर्यादा पाळणाऱ्यांना सूट
दरम्यान, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मध्ये निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या साऊंड सिस्टीमना या अधिसूचनेतून सूट देण्यात आली आहे. मात्र, आदेशातील कोणत्याही अटीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.
उत्सव साजरा करताना श्रद्धा, परंपरा आणि आनंद कायम ठेवत इतरांच्या शांततेचा आणि आरोग्याचा विचार करणारा हा निर्णय म्हणून जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या आदेशाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
