भंडारा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी आलेल्या पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान तुमसरच्या खापा चौकात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. हातात करपलेल्या धानाच्या पेंडी घेऊन सकाळपासून पालकमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी चौकातच ठिय्या आंदोलन केले. पालकमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीत व्यस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

यंदाच्या हंगामात पावसातील खंडाचा फटका धान पिकांना बसला असून अनेक शेतांमध्ये पीक पिवळे पडले आहे. प्रारंभीच्या दुष्काळी यादीत मोहाडी आणि तुमसरचा समावेश नसल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यानंतर १ ऑक्टोबरला राज्य सरकारने मोहाडी आणि तुमसरसह १९ अतिरिक्त तालुक्यांत २० टक्के पीक सर्वेक्षण व ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर शेतकरी पालकमंत्र्यांसमोर प्रत्यक्ष नुकसानीची स्थिती मांडण्यासाठी प्रयत्नशील होते.

‘करपलेलं धान घेऊन बसलो, भेटायला वेळ नाही’

खापा चौकात शेतकरी हातात करपलेल्या धानाच्या पेंडी घेऊन पालकमंत्र्यांची वाट पाहत होते. शेतीची अवस्था आणि संभाव्य नुकसानीची व्यथा प्रत्यक्ष सांगण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र, पालकमंत्री पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीत व्यस्त असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नसताना कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारण्यासाठी वेळ मिळतो, अशी खंतही एका तरुण शेतकऱ्याने व्यक्त केली. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने भर चौकात डफली वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नसेल, तर त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष कशा समजणार, असा सवाल त्याने केला. दुष्काळाची पाहणी करताना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. या प्रकारामुळे काही काळ खापा चौकात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले.

भेटीच्या मागणीवर ठिय्या; पोलिसांचा हस्तक्षेप

पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन व्यथा ऐकून घेतल्याशिवाय रस्ता सोडणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पालकमंत्री पंकज भोयर यांनी मोहाडी तालुक्यातील हिवरा, जाम, धोप, कांद्री तसेच तुमसर तालुक्यातील देव्हाडा, सुकळी आणि पालोरा परिसरातील पिकांची पाहणी केली. प्रत्यक्ष नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन कृषी व महसूल विभागाने आवश्यक पीक पंचनामे करावेत आणि अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. दुष्काळाची तीव्रता केवळ शेतांच्या बांधावर दिसणाऱ्या करपलेल्या पिकांत नाही, तर ती शेतकऱ्यांच्या हातातील त्या धानाच्या पेंडींत आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी उभ्या असलेल्या गर्दीतही दिसून आली. पाहणीसोबतच शेतकऱ्यांचा आवाज प्रत्यक्ष ऐकला जावा, हीच या आंदोलनातून पुढे आलेली प्रमुख अपेक्षा ठरली.