भंडारा : शेतात उभं असलेलं धान पिवळं पडलंय… पावसाने दगा दिल्याने महिन्यांची मेहनत डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ आलीय… हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेण्याची भीती आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. ही व्यथा सांगताना तुमसर-मोहाडीतील शेतकऱ्यांचा कंठ दाटून आला. काही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हातात धानाची पेंडी घेऊन त्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर आपल्या शेताची अवस्था मांडली. बांधावर दिसणारे हे चित्र दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांच्या व्यथेचे विदारक वास्तव स्पष्ट करणारे ठरले.
यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला असून अनेक ठिकाणी धान पिवळे पडले आहे. अपेक्षित उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या निकषांमध्ये प्रत्यक्ष पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मोहाडी तालुक्यातील हिवरा, जाम, धोप, कांद्री तसेच तुमसर तालुक्यातील देव्हाडा, सुकळी आणि पालोरा येथे शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पावसातील खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम, उत्पादनातील संभाव्य घट आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली.
करपलेल्या पिकाकडे पाहून शेतकऱ्यांचा कंठ दाटला…
पिकाची अवस्था सांगताना अनेक शेतकऱ्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. वर्षभर शेतात राबूनही हातात अपेक्षित उत्पादन येणार नसल्याची चिंता त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाली. पिकावर केलेला खर्च, कर्जाची परतफेड आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता त्यांच्या पुढे उभा आहे. त्यामुळे केवळ पाहणी नव्हे, तर नुकसानीची अचूक नोंद होऊन मदतीचा आधार मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
परिस्थितीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन कृषी आणि महसूल विभागाने आवश्यक पंचनामे करावेत तसेच प्रत्यक्ष पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सध्याच्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक कृषीविषयक मार्गदर्शन आणि उपाययोजना तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांनी धान उत्पादकांना बोनस देण्याची मागणी केली. तसेच प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन बाधित भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व सवलतींचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्र्यांसोबत आमदार राजू कारेमोरे, आमदार परिणय फुके, तसेच महसूल, जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, कृषी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आणून दिल्या. दुष्काळाची खरी तीव्रता कागदावरील आकडेवारीपेक्षा बांधावर अधिक स्पष्ट दिसते. पिवळे पडलेले धान, कोरडी पडलेली जमीन आणि आपल्या पिकाकडे असहायपणे पाहणारा शेतकरी हे चित्र सध्या भंडाऱ्यातील ग्रामीण वास्तव सांगत आहे. आता या वेदनेची नोंद पंचनाम्यात किती अचूकपणे होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हाताला मदतीचा आधार किती मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
