भंडारा : जिल्ह्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनाही ‘एमडी ड्रग्ज’ सहज उपलब्ध होत असल्याचे त्यांनी म्हटल्याने संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकांमध्ये मोठी खळबळ

खासदार पडोळे यांनी या प्रकरणावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हे अत्यंत गंभीर प्रकरण असून भविष्यातील पिढी धोक्यात येण्याची शक्यता आहे. या रॅकेटचा समूळ नायनाट करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच शाळा स्तरावर विशेष समित्या स्थापन करून किंवा स्वतंत्र पथक तयार करून विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या ड्रग्सच्या वापरावर नियंत्रण ठेवावे, अशीही सूचना त्यांनी केली.
या दाव्यानंतर शिक्षण क्षेत्रात तसेच पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांपर्यंत अमली पदार्थ पोहोचत असल्याचा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. समाजातील विविध घटकांकडून याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत आहे.

सरकारची भूमिका काय?

दरम्यान, या आरोपांना उत्तर देताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “राज्य सरकार ड्रग्सविरोधात अत्यंत संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अँटी नार्कोटिक्स पॉलिसी लागू केली असून, राज्यभरात अमली पदार्थांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

prashant padole on bhandara drugs case

जनजागृतीसाठी विशेष मोहीम

भोयर यांनी पुढे सांगितले की, पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांच्या परिसरात विशेष नजर ठेवली जात असून, संशयितांवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

कारवाईकडे लक्ष

या संपूर्ण प्रकरणामुळे भंडारा जिल्ह्यात ड्रग्जच्या वाढत्या जाळ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.