भंडारा : शहरातील अनेक रस्ते, जिल्हा मार्ग रुंद झाले खरे मात्र रस्त्यांच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबामुळे त्यांच्या रुंदीकरणाचा काहीही उपयोग होत नाही. उलट वाहतुकीसाठी ते मोठा अडथळा बनले आहेत. केवळ या खांबांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. हे विद्युत खांब काढण्याची जबाबदारी कोणाची याचा वाद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणात यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी राजीव गांधी चौक ते नागपूर नाकापर्यंत सुरू असलेल्या प्रमुख जिल्हा मार्गावर असलेल्या एका विद्युत खांबाला धडकल्याने एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाकापर्यंत सुरू असलेल्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या मधोमध तब्बल २४ यमदूत उभे असल्याचे वृत्त दैनिक लोकसत्ताने १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर हे यमदूत रूपी विद्युत खांब नागरिकांसाठी प्राणघातक ठरू असल्याने लवकरात लवकर हे विद्युत खांब बाजूला करण्याची मागणी देखील अल्पसंख्याक मोर्चाचे भाजपचे प्रदेश सचिव आबीद सिद्दिकी यांनी केली होती. रत्यावरील खांब वननधारकांच्या जीवाशी खेळत असताना महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
नागपूर नाका ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या प्रमुख जिल्हा मार्गाला दशकापासून लागलेली घरघर २०२४ मध्ये संपली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या जिल्हा मार्ग-२१ च्या सिमेंटीकरणासाठी २३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. वर्षापूर्वी निधी मंजूर झाला, निविदा निघाल्या, १६ मार्च २०२४ ला कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन दोन महिन्यानंतर ५ मे २०२४ रोजी कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. हा रस्ता अनेक अडथळ्यांच्या शुक्लकाष्ठातून सुटल्यानंतर काम सुरू झाले, मात्र त्या कामाचाही बट्ट्याबोळ सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका आणि महावितरण या तीन विभागातील कारभाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा गोरू पटेल या तरुणाचा याच मार्गाने जाताना विद्युत खांबाच्या धडकेत जोरदार अपघात झाला. गोरू पटेल यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. लोकांचा जीव गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येते. शीतला माता मंदिर मार्ग हे याचे उत्तम उदाहरण. कारधा बायपासवर देखील असेच मृत्यूचे दूत उभे आहेत. या मार्गाने अवजड वाहतूक सुरू असते. किती लोकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कामासाठी निधी मंजूर करून आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील विसर पडला आहे हे त्याहून दुर्दैवी ! – प्रमोद केसलकर, सामाजिक कार्यकर्ते, भंडारा</strong>
रस्ते विकासात महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने खोडा घातला आहे. त्यामुळे शासनाच्या ताब्यातील या दोन विभागांत समन्वयाचा अभाव ठळकपणे दिसत आहे – आबीद सिद्दिकी, प्रदेश सचिव, भाजप अल्पसंख्याक मोर्चा, भंडारा.
या मार्गाचे काम कासवगतीनेच सुरू आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका आणि महावितरण यांच्या नियोजनशून्येचा आणि बेपर्वाईचा फटका या कामाला बसला आहे. नागपूर कडून शहरात जाणारा हा प्रमुख मार्ग असून याच मार्गावर अनेक हॉस्पीटल असल्याने रुग्णवाहिका तसेच विद्यार्थ्यांना देखील याच मार्गाने शाळेत जावे लागते. हे जीवघेणे खांब काढण्यासाठी कशाची वाट आहे? – विजय क्षिरसागर, विशेष कार्यकारी अधिकारी, भंडारा.