भंडारा : शेतातील कामासाठी घरातून निघालेल्या एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा चिखलात पाय घसरल्याने कालव्यातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तोंडघशी पडून गुदमरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे घडली. शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गोसे खुर्दच्या डाव्या कालव्यालगत ही दुर्घटना घडली. प्रमोद ईश्वर ठाकरे (वय ३०, रा. कुडेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद ठाकरे हे अल्पभूधारक शेतकरी होते. कुडेगाव शिवारात त्यांची सुमारे ०.२० हेक्टर शेती असून, यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी आपल्या शेतात भात पिकाची लागवड केली होती.
दररोजप्रमाणे शनिवारी सकाळीही ते शेतातील कामासाठी घरातून निघाले होते. गोसे खुर्दच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्याने ते आपल्या शेताच्या दिशेने जात असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला होता. याच दरम्यान अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते कालव्यातील चिखल व पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात तोंडघशी पडले. खड्ड्यात पडताच त्यांच्या तोंडात व नाकात चिखलमिश्रित पाणी गेल्याने त्यांना श्वास घेता आला नाही. मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नसल्याने काही क्षणांतच त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर काही वेळाने शेतातील कामासाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर प्रमोद यांच्या कुटुंबीयांनाही घटनेची खबर देण्यात आली. माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. दरम्यान, लाखांदूर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रमोद ठाकरे हे कुटुंबातील एकुलते एक कमावते सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. अशा परिस्थितीत तरुण वयात त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू ठाकरे कुटुंबावर मोठा आघात ठरला आहे. ही बातमी गावात पोहोचताच कुडेगावसह परिसरात शोककळा पसरली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी तसेच त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
