भंडारा : शेतकरी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने हताश होतात. प्रशासकीय दिरंगाईचा कळस गाठल्याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे भंडारा जिल्ह्यात समोर आलेली एक घटना. आपल्या हक्काच्या जमिनीसाठी सात वर्षांपासून लढा देणारा शेतकरी अखेर आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी पेट्रोलची कॅन घेऊन थेट भूमी अभिलेख कार्यालय गाठले. ही संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात घडली आहे.

मोहाडी येथील अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एका संतप्त शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमिनीच्या मोजणीत वारंवार होणारे बदल आणि प्रशासनाकडून मिळणारी टोलवाटोलवी याला कंटाळून या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.मोहाडी तालुक्यातील कळमना येथील शेतकरी प्रमोद गभणे यांची भूक्र. ३७/२ मधील सव्वा एकर जमीन आहे.२०१७ मध्ये मोजणी आणि नकाशा तयार होऊनही वारंवार बदलणाऱ्या हद्दींमुळे शेतकरी त्रस्त होता.

अनेकवेळा अर्ज देऊनही भूमी अभिलेख कार्यालयाने दखल न घेतल्याने शेतकऱ्याने पेट्रोलची कॅन घेऊन कार्यालय गाठले.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्याच्या हातातील पेट्रोलची कॅन ताब्यात घेतली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. आणि विशेष म्हणजे, या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या भूमी अभिलेख विभागाने तातडीने हालचाली करत थेट शेताच्या बांधावर जाऊन मोजणीची प्रक्रिया सुरू केली. ज्या कामासाठी वर्षानुवर्षे टाळाटाळ केली जात होती, त्यासाठी यंत्रणा काही तासांतच थेट बांधावर पोहोचली.

अशी आहे प्रकरणाची पार्श्वभूमी…

२०१७ मध्ये मोजणी करून प्रमोद गभणे आणि अशोक गभणे या भावांच्या शेतीचा पोटहिस्सा निश्चित केला होता. दरम्यान, त्याच्या शेता शेजारील शेतकरी अनिल भुरे यांनी रामकुमार चौधरी यांना २६ जुलै २०२२ ला शेती विकली. ७ नोव्हेंबर २०२४ ला शेतीचे मोजमाप केले असता, प्रमोद गभणे यांच्या शेतात १५ फूट हद्द निघाली.

त्यानंतर ५ डिसेंबर २०२५ ला फेरमोजणी केली. यावेळी अशोकच्या जमिनीची हद्द पूर्वीसारखीच राहिली. पण प्रमोदच्या जमिनीची हद्द चौधरी यांच्या शेतात काढण्यात आली. त्यामुळे पुन्हा ५ जानेवारी २०२६ ला फेरमोजणी केली. यात ती जमीन प्रमोद गभणे यांच्या हद्दीत असल्याचे मोजमापात आले.
या मोजणीवर चौधरी यांनी ३१ जानेवारी २०२६ ला आक्षेप घेतला. पुन्हा मोजणी करून घेतली.

त्यातही तफावत आढळली. यामुळे वाद वाढला. प्रमोद गभणे यांनी ३० जानेवारी २०२६ ला तहसीलदार, अधीक्षक जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर, ११ फेब्रुवारीला प्रमोद गभणे यांनी आत्मदहनाचा अर्ज दिला. मात्र, तेदेखील कुणी गंभीरपणे न घेतल्याने अखेर बुधवारी प्रमोद गभणे पेट्रोल भरलेली कॅन सोबत घेऊनच आत्महनासाठी भूमी अभिलेख कार्यालयात पोहोचले.

प्रतिक्रिया

शेतावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व मोक्का तपासणी केली. उच्च तपासणीसाठी चारपट फी भरावी लागते. मात्र, ही मोजणी
मोफत करून देणार आहोत. प्रकाश ढगे, प्रभारी उपअधीक्षक, भूमी अभिलेख

प्रतिक्रिया..

उपअधीक्षकांनी प्रत्यक्ष शेतावर येऊन चौकशी केली असून, योग्य मोजणीचे आश्वासन दिले आहे. मोजणी होईपर्यंत मी शांत राहणार आहे. प्रमोद गभणे, पीडित शेतकरी