भंडारा : सहा दिवसांपूर्वी मोहगाव खदान येथे जुन्या वादातून साठ वर्षीय वृद्धाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आज तुमसर तालुक्यात पुन्हा एका हत्येचा थरार घडला. जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रोंघा येथे घडली आहे. एकनाथ धनराज ठाकरे, ३४, रा. गोवर्धन नगर तुमसर असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. गोबरवाही पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एकनाथ हा तुमसर लघु पाटबंधारे विभागातील मृदा व जलसंधारण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता. तुमसर येथील गोवर्धन नगरात तो कुटुंबासह राहत होता. मात्र एकनाथला पैशांची अडचण भासत असल्याने तो नेहमीच वडिलांकडे पैशाची मागणी करीत असे. एकनाथचे वडील आरोपी धनराज डोमा ठाकरे(५८, रोंघा) हा मात्र पैसे देण्यास नकार देत होते. घटनेच्या दिवशी एकनाथ तुमसर वरून गावाला आला होता. त्याने वडिलांकडे पैशाची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोप्याला जावून अखेर रागाच्या भरात बापानेच लेकाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. मृतक एकनाथ रक्ताच्या थारोळ्यात पाडून होता तर रागाच्या भरात पोटच्या पोराला यमसदनी पोहचविणारा आरोपी बापही सुन्न होऊन तिथेच बसून होता. पोलिसांनी आरोपीला तेथूनच ताब्यात घेतले.

हेही वाचा…“गडचिरोलीतील खनिजांवर सरकारचा डोळा,” वांडोली चकमकीवरून नक्षलवाद्यांची आगपाखड

या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा…‘‘हत्तीरोग बाधितांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्या,’’ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे निर्देश

मोहगाव खदान हत्या प्रकरण…

पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या मोहगाव (खदान) येथील एका ६० वर्षीय वृद्धाची जुन्या वैमनस्यातून निघृण हत्या करण्यात आली. ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. सत्यवान गायकवाड, ६० वर्षे हे घरी एकटेच राहत होते. त्याची दोन मुले बाहेरगावी रहायची. घटनेच्या दिवशी सकाळी सत्यवान यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या डोक्याला जबर मार होता. घटनेचे वृत्त कळताच सिहोरा पोलिसांची चमू घटना स्थळावर दाखल झाली. श्वान पथकाच्या मदतीने तपासाची चक्रे पोलिसांनी वेगाने फिरवली असता आरोपी शैलेश उईके (३५) यास अटक करण्यात आली होती.