भंडारा : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून वाहनधारकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे तर दुसरीकडे काही पेट्रोल पंप धारकांनी पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगून पेट्रोल आणि डिझेलचे वितरण बंद केले आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासूनही हा पेट्रोल पंप बंद आहे.

पवनी तालुक्यातील अशाच एका पेट्रोल पंपावर काल रात्री वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली. मात्र पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल संपले असे सांगून पेट्रोल वितरण बंद केले. शिवाय लाईटही बंद करण्यात आले. बराच वेळ अंधारात वाहन चालक पेट्रोल पंपावर तात्काळत वाट बघू लागले. तर काही संतप्त वाहनधारकांनी आरडाओरडा सुरू केला. एका वाहन चालकाने तर ‘घरी जाण्यासाठी सुद्धा माझ्या गाडीत पेट्रोल नाही आता मी पेट्रोल पंपावरच रात्रभर झोपतो’ असा संताप व्यक्त करत पेट्रोलपंप धारकाला धारेवर धरले.

वाहनधारकांना वेठीस धरण्याचा प्रकार..

पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथील नायरा या पेट्रोल पंपावर हा संपूर्ण प्रकार घडला. याबाबत काही प्रत्यक्ष दर्शनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, पेट्रोल पंपावर मुबलक पेट्रोल उपलब्ध असताना जाणीवपूर्वक पेट्रोलचे वितरण केले जात नसल्याचा आरोप काही दुचाकी चालकांनी केला. नऊ वाजून ४५ मिनिटांनी पेट्रोल आणि डिझेलसाठा उपलब्ध नाही असे सांगून अचानक पेट्रोल पंप बंद करण्यात आला.

पेट्रोल वितरण सुरू असताना विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचेही काही वाहन चालकांनी सांगितले. विशेष म्हणजे आज सकाळपासून हा पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला आहे. पेट्रोल साठा उपलब्ध नसल्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला अशाप्रकारे वेठीस धरले जात असल्याने नागरिकांमध्ये उद्रेक उसळला आहे.

पेट्रोल भरून पुन्हा रांगेत लागतात..

याबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी नायरा पेट्रोल पंपाचे मालक मंगेश ओके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या पेट्रोल आणि डिझेल साठा उपलब्ध नाही त्यामुळे आज रात्री पेट्रोल पंप बंद करण्यात आला आहे. उद्या सकाळी आठ वाजता पुन्हा सुरू करण्यात येईल. एका दुचाकी चालकाला पेट्रोलची नितांत गरज असल्याने मी स्वतः माझ्या गाडीतून पेट्रोल काढून त्याला दिल्याचे उईके यांनी सांगितले.

जनरेटर मध्ये भरायला डिझेल नसल्याने लाईट बंद करण्यात आल्याचे ते म्हणाले. काही वाहनधारक अधिक प्रमाणात पेट्रोल मागत होते तर काही कॅनमध्ये पेट्रोल देण्याचा आग्रह धरत होते, शिवाय काही वाहन चालक कमी पेट्रोल दिल्यामुळे पुन्हा रांगेत लागून पेट्रोल भरण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे शेवटी आम्ही पेट्रोल पंप बंद केला असेही उईके यांनी सांगितले.

पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा..

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅससाठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर सनियंत्रण केले जात आहे, असा दावा जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार केला जात आहे. मंगळवारपासून (दि.24) शहरातील विविध पेट्रोल पंपावर लागलेल्या वाहनांच्या रांगा भविष्याची चिंता वाढविणाऱ्या दिसत आहेत. अनेक पेट्रोल पंप बंद झाले असून स्टॉक नसल्याचे बोर्ड लागले असल्याने लोक संतप्त आहेत. भंडारा शहरातील प्रगती कॉलनी येथील पेट्रोल पंप देखील दिवस बंद होता.

तुमसर येथील तीन पेट्रोल पंप पेट्रोल साठा उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावून आज सकाळपासून बंद ठेवण्यात आले आहे. काल रात्री तुमसर, मोहाडी तसेच जवाहर नगर येथील पेट्रोल पंपावर देखील मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या. अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मायबाप सरकार टंचाई नाही मग पेट्रोल पंपावर, गॅससाठी रांगा का ? हा त्यांचा सवाल आहे.

प्रशासनाचे आवाहन

पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आज तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांच्या (BPCL, HPCL आणि IOCL) सेल्स ऑफिसरशी (विक्री अधिकारी) सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याची खात्री करण्यात आली आहे.

पुरवठा सुरळीत : तिन्ही तेल कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून मागणीनुसार पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

अफवांवर विश्वास नको : इंधन संपणार असल्याच्या चुकीच्या बातम्या किंवा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नये.

साठेबाजीवर कडक कारवाई: इंधन टंचाईचा गैरफायदा घेऊन जर कोणी पेट्रोल-डिझेलची अवैध साठेबाजी करत असेल किंवा चढ्या दराने विक्री करत असेल, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियमित संचलन : सर्व पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील आणि ग्राहकांना आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध करून दिले जाईल.

​ऑनलाईन पेट्रोलपंप चालकांना क्रेडीटवर इंधन देणे कंपन्यांनी बंद केले आहे. शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस आल्याने पंपचालकांमार्फत आरटीजीएस झाले नाही. निधी न मिळाल्याने इंधनही प्राप्त झाले नाही. त्यामुळे पेट्रोलचा पुरवठा झाला नाही. लवकरच इंधनाचा पुरवठा होवून वितरण सुरळीत होईल. – नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी