भंडारा : आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता थेट सर्वसामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होवू लागला आहे. त्याचा परिणाम व्यावसायिक व घरगुती गॅस सिलिंडरवर होऊ लागला आहे.

ऑनलाइन नोंदणी बंद

भंडारा जिल्ह्यात ग्राहकांना प्रचंड गॅसटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन बुकिंग बंद झाल्यामुळे शहरांतील गॅस सिलेंडर एजन्सीसमोर गॅस सिलिंडरसाठी एजन्सींपुढे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मागील तीन दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडर वितरण बंद झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटचे मालक हैराण झाले आहेत.

पहाटेपासून रांगा..

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने येणाऱ्या काळात गॅस सिलिंडर मिळणे अवघड होईल याची भीती ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे घरातील रिकामी गॅस टाकी घेऊन ग्राहकांनी गॅस कार्यालयात धाव घेतली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना पहाटेपासून गोदामांसमोर मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत.

नागपूर वरून होणारा गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना ताटकळत राहावे लागत असून अचानक ग्राहक गॅस वितरणच्या कार्यालयासमोर आल्याने एकच झुंबड उडाली. अशीच परिस्थिती बहुतेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे.

व्यवसायिकांचे रोजगार ठप्प..

आठवडाभरापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट आणि केटरिंग व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लग्नसराईत केटरर्ससमोर अडचणींचा डोंगर..

सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक केटरिंग व्यावसायिकांनी लग्नकार्ये आणि विविध सामाजिक समारंभांचे आगाऊ बुकिंग घेतले आहे. मात्र, ऐन लग्नसराईत गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने भोजन व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न केटरर्ससमोर उभा ठाकला आहे. गॅस उपलब्ध नसल्यास कोळसा, सरपण किंवा केरोसीनचा वापर करावा लागेल, मात्र या वस्तूही सहज उपलब्ध होत नसल्याने खनावळी चालवणे जिकिरीचे झाले आहे. या परिस्थितीमुळे नियोजित समारंभांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

जिल्ह्यात हजारो हॉटेल आणि केटरिंग व्यवसायांवर मोठे कारागीर, कामगार आणि महिला कर्मचारी अवलंबून आहेत. जर येत्या दोन दिवसांत गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर हे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावे लागतील. याचा थेट परिणाम कामगारांच्या रोजगारावर होऊन बेरोजगारीचा प्रश्न गंभीर रूप धारण करू शकतो. अनुभवी व्यावसायिकांच्या मते, अशी अभूतपूर्व परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. केवळ दरवाढच नाही, तर पुरवठाही बंद होऊ शकतो, अशी माहिती वितरकांकडून मिळत असल्याने हॉटेल मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सरकारने मधला मार्ग काढावा..

गॅस सिलेंडरच्या दरात झालेली भरमसाठ वाढ आणि खंडित झालेला पुरवठा यामुळे हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. सरकारने यावर तातडीने तोडगा काढून पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू ठेवावा, अशी मागणी केली जात आहे. केंद्र सरकारने या संकटात हस्तक्षेप करून व्यावसायिकांना आणि कामगारांना दिलासा द्यावा, असे साकडे घालण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडणारी आहे. महागाईमुळे ग्राहक कमी होत असताना पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने आम्ही चिंतेत आहोत. सरकारने तातडीने दखल घेऊन हॉटेल क्षेत्राला वाचवावे. विनोद भुरे, संचालक, कान्हा रिसोर्ट, कोका (भंडारा)

सध्या आमचा पूर्ण सिस्टम बंद झालेला आहे. काल ११०० बुकिंग होत्या मात्र सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे आम्ही ग्राहकांना “सिलेंडर जपून वापरा” या सल्ल्याशिवाय काहीच देऊ शकत नाही. लोकेश भोंगाडे, इंडियन गॅस एजन्सी, भंडारा</strong>

गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. दोन दिवसात गॅस सिलेंडर संपल्यानंतर माझा व्यवसाय बंद करावा लागणार आहे. माझ्या दुकानात १५ जण कामाला असून व्यवसाय बंद झाल्यामुळे माझ्यासह १५ जणांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ येत आहे. संतोष पावभाजी सेंटर, भंडारा.