गोंदिया : विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात अखेर उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीच्यावतीने भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांना तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.
अखेर घोषणा
दिल्लीतील महायुतीच्या निर्णायक बैठकीनंतर जागावाटपाचा दीर्घकाळ चर्चेत असलेला तिढा सुटला आणि भंडारा-गोंदियाची जागा भाजपच्या वाट्याला आली. त्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
कोण आहेत ब्राह्मणकर, अग्रवाल?
अखेर साकोली विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये अत्यंत अल्प मताधिक्याने पराभूत झालेले अविनाश ब्राम्हणकर यांच्यावर भाजप नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेले ब्राम्हणकर हे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांना रिंगणात उतरवले आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय संपर्क, विविध संस्थांमधील प्रभाव आणि आघाडीच्या घटक पक्षांचा पाठिंबा या बळावर अग्रवाल निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आवश्यक असल्यास अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
भाजपकडे अधिक मतबळ
या निवडणुकीचे खरे गणित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांमध्ये दडलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद तसेच इतर स्थानिक संस्थांमधील निवडून आलेले सदस्य या निवडणुकीचे मतदार आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघात एकूण ४५७ मतदार असून त्यामध्ये महायुतीकडे महाविकास आघाडीपेक्षा जवळपास शंभर मतांचे संख्याबळ अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अंकगणिताच्या दृष्टीने महायुतीचे पारडे जड दिसत असले तरी राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते, हे वास्तव नाकारता येत नाही.
