गोंदिया : राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाट्याला गेल्याने या मतदारसंघातील राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. दिल्लीतील महायुतीच्या निर्णायक बैठकीनंतर जागावाटपाचा बहुचर्चित तिढा जवळपास सुटला असला, तरी आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे. भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार?

चर्चेचा धुरळा

सत्तेच्या राजकीय वर्तुळापासून जिल्ह्यातील राजकीय कट्ट्यांपर्यंत याच चर्चेचा धुरळा उडताना दिसत आहे. जागा भाजपच्या खात्यात गेल्याने इच्छुकांच्या आशा उंचावल्या असून, पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षांच्या वर्तुळात लॉबिंगला वेग आला आहे. राजकीय समीकरणे, सामाजिक संतुलन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकद आणि आगामी निवडणुकांची रणनीती या सर्व घटकांचा विचार करूनच भाजप नेतृत्व अंतिम निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीत भंडारा-गोंदिया मतदारसंघाची जागा भाजपने स्वतःकडे राखून ठेवल्याने या मतदारसंघाचे राजकीय महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

‘चिन्ह’ भाजपचे; पण चेहरा कोणाचा?

भंडारा-गोंदियाच्या राजकीय पटावर सध्या याच प्रश्नाभोवती चर्चा फिरत आहे. भाजपमधील अनेक निष्ठावान कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे, विजयाची खात्री आणि व्यापक सामाजिक समीकरणे जुळवण्यासाठी मित्रपक्षातील प्रभावी चेहऱ्यालाही भाजपकडून संधी मिळू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले असून, उमेदवारीच्या अंतिम निर्णयापर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षश्रेष्ठी मात्र अत्यंत सावध भूमिका घेत असून, कोणत्याही प्रकारची अंतर्गत नाराजी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

प्रतिष्ठेची लढत; स्थानिक स्वराज्य संस्थांचे गणित निर्णायक

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेता ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपसाठी ही जागा जिंकणे म्हणजे विदर्भातील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची संधी ठरणार आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागेचा निकाल केवळ एक विधानपरिषद सदस्य निवडण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो भविष्यातील राजकीय दिशा आणि जनाधाराचे संकेत देणारा ठरू शकतो. त्यामुळेच प्रत्येक निर्णय अत्यंत मोजून-मापून घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.

सुनील फुंडे यांचा ‘प्लॅन बी’

दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. जागावाटपात भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता कमी असल्याचे लक्षात घेत फुंडे यांनी पर्यायी राजकीय रणनीती आखल्याची चर्चा आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, महायुतीकडून राष्ट्रवादीला उमेदवारीची संधी मिळाली नाही, तर सुनील फुंडे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवून आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्यास प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे संकेत त्यांनी दिल्याने या निवडणुकीत नवा राजकीय रंग भरला आहे.

उत्सुकता शिगेला

सध्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात राजकीय समीकरणांचे ढग सतत आकार बदलताना दिसत आहेत. उमेदवारीची घोषणा होईपर्यंत अनेक नावांची चर्चा होणार, नवी समीकरणे जन्म घेणार आणि काही जुनी समीकरणे कोलमडणार, हे निश्चित मानले जात आहे.

एकूणच, जागा भाजपच्या वाट्याला गेली असली तरी अंतिम उमेदवार कोण ठरणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. राजकारणाच्या या बुद्धिबळातील पुढची चाल कोण खेळणार आणि कमळ अखेर कोणाच्या हाती फुलणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी सध्या मात्र भंडारा-गोंदियाच्या राजकीय आकाशात उत्सुकतेचे ढग दाटून आले आहेत.