भंडारा : भंडारा गोंदियाच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून एकच लढाई सातत्याने सुरू आहे, ती म्हणजे नाना पटोलेंच्या साकोली या अभेद्य किल्ल्याला खिंडार पाडण्याची. नाना पटोलेंचा अभेद्य गड भेदण्यासाठी अनेक राजकीय डावपेच आखले गेले, अनेक समीकरणे जुळवली गेली; मात्र प्रत्येक वेळी निकालानंतर नानांचे वर्चस्व अधिक ठळकपणे समोर आले. मात्र विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतरही महायुतीने शस्त्र बदलले नाही, उलट त्याच अविनाश ब्राह्मणकरांवर पुन्हा एकदा राजकीय डाव खेळला आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ एका जागेचा निकाल राहिलेला नाही; तो नाना पटोले, प्रफुल पटेल आणि परिणय फुके यांच्या राजकीय प्रभावाचा जनमत कौल ठरणार आहे.

विशेष म्हणजे ब्राह्मणकर विजयी झाल्यास साकोलीला एकाच वेळी विधानसभा आणि विधान परिषद असे दोन आमदार मिळतील. मात्र त्यानंतर साकोलीच्या राजकारणात नेतृत्वाचे दोन ध्रुव निर्माण होणार का, नानांविरोधातील महायुतीचा हा नवा राजकीय सापळा आहे का आणि एका म्यानात दोन तलवारी किती काळ राहू शकतील, याची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळाला लागली आहे.

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत १०० टक्के मतदान झाल्यानंतर आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र ही निवडणूक केवळ एका जागेचा निकाल ठरवणारी नसून साकोलीसह भंडारा-गोंदियातील भविष्यातील राजकीय समीकरणांची दिशा निश्चित करणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. विशेषतः महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर विजयी झाल्यास साकोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

साकोली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही वर्षांत नाना पटोलेंना रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महायुतीने विविध प्रयोग केले, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीतही महायुतीने अविनाश ब्राह्मणकर यांच्यावरच विश्वास दाखवला होता. परिणय फुके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत ब्राह्मणकरांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती. तरीही नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आपला गड अभेद्य असल्याचे सिद्ध केले.राजकीय वर्तुळात त्यावेळी एक प्रश्न सातत्याने उपस्थित झाला होता. भाजपसारख्या संघटनात्मकदृष्ट्या बलाढ्य पक्षाकडे साकोलीत नाना पटोलेंना थेट आव्हान देणारा स्वतःचा चेहरा नव्हता का? त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्श्वभूमीचे अविनाश ब्राह्मणकर यांना पुढे करावे लागले का? हा प्रश्न आजही कायम आहे.

आता विधान परिषद निवडणुकीतही पुन्हा त्याच ब्राह्मणकरांवर दाव लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ब्राह्मणकर हे केवळ महायुतीचे उमेदवार नाहीत, तर ते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सेनापती आणि जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा संभाव्य विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय न राहता प्रफुल पटेल यांच्या राजकीय प्रभावाची पुनर्स्थापना म्हणूनही पाहिला जात आहे.

भविष्यातील विधानसभा समीकरणे

राजकीय विश्लेषकांच्या मते, या उमेदवारीमागे आणखी एक सूक्ष्म राजकीय गणित दडलेले आहे. जर अविनाश ब्राह्मणकर विधान परिषदेत पोहोचले, तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना साकोलीतून उमेदवारी देण्याचा प्रश्न जवळपास संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत महायुतीला पुन्हा एकदा परिणय फुके किंवा अन्य नव्या चेहऱ्यावर भरवसा ठेवावा लागू शकतो. म्हणजेच ब्राह्मणकरांना विधान परिषदेत पाठवून एकाच वेळी नाना पटोलेंना राजकीय आव्हान देणे आणि भविष्यातील विधानसभा समीकरणे नियंत्रित ठेवणे, अशी भाजप-राष्ट्रवादीची दुहेरी खेळी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

नेतृत्वाचे दोन स्वतंत्र ध्रुव

या निवडणुकीतील सर्वात रंजक बाब म्हणजे नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर हे दोघेही साकोली मतदारसंघाशी संबंधित आहेत. ब्राह्मणकर विजयी झाल्यास साकोलीला विधानसभा आणि विधान परिषद असे दोन आमदार मिळतील. मात्र त्यानंतर साकोलीतील राजकीय केंद्रबिंदू कोण राहणार, कार्यकर्त्यांची निष्ठा कुणाकडे झुकणार, विकासकामांचे श्रेय कोण घेणार आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव कोणाच्या बाजूने वाढणार, यावर नव्या संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.एकीकडे विधानसभा सदस्य म्हणून नाना पटोले यांचे अस्तित्व कायम राहणार, तर दुसरीकडे विधान परिषद सदस्य म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांचे राजकीय वजन वाढणार. त्यामुळे साकोलीत नेतृत्वाचे दोन स्वतंत्र ध्रुव निर्माण होण्याची शक्यता आहे.
परिणामी, “एका म्यानात दोन तलवारी किती दिवस राहणार?” हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

आगामी राजकीय संघर्षाची नांदी

२२ जूनचा निकाल केवळ एका उमेदवाराचा राजकीय भवितव्य ठरवणार नाही, तर नाना पटोले, प्रफुल पटेल आणि परिणय फुके या तिन्ही नेत्यांच्या प्रभावक्षेत्राची खरी ताकदही उघड करणार आहे. त्यामुळे भंडारा-गोंदियातील राजकारणासाठी ही निवडणूक एक सामान्य निवडणूक नसून आगामी राजकीय संघर्षाची नांदी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत सध्या दिसत आहेत.