भंडारा : जुलै महिन्याची सुरुवात होताच पावसाने दमदार हजेरी लावल्याने गोसेखुर्द धरणाचे तब्बल ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ३७०६.९८ क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून धापेवाडा बंधाऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कारधा नदीची पातळी सध्या इशारा पातळीखाली असली तरी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पावसामुळे धरणांवर प्रशासनाची करडी नजर..
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर धरणांतील पाणीसाठा आणि नदीपात्रातील पाणीपातळीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. शनिवारी (४ जुलै) सकाळी ९.१७ वाजेपर्यंतच्या भंडारा पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, गोसेखुर्द आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी कारधा नदीची पातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असल्याने तातडीचा धोका नसल्याचे चित्र आहे.
पुजारीटोला, बावनथडी आणि संजय सरोवरची स्थिती..
पुजारीटोला धरणात ८०.०१ टक्के पाणीसाठा असून चार दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. येथून ८६ क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बावनथडी धरणात १४.३९ टक्के, तर संजय सरोवरात १५.९० टक्के पाणीसाठा असून या दोन्ही धरणांचे दरवाजे बंद आहेत आणि कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
गोसेखुर्द आणि धापेवाडातून मोठा विसर्ग
जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी स्थिती गोसेखुर्द धरणाची आहे. धरणात ३५.६५ टक्के पाणीसाठा असला तरी तब्बल ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडून ३७०६.९८ क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच धापेवाडा बंधाऱ्यात ७८.८६ टक्के पाणीसाठा असून १५ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. येथून ४३१५.९५ क्युमेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कारधा नदी अद्याप इशारा पातळीखाली..
कारधा नदीची इशारा पातळी २४५.०० मीटर, तर धोक्याची पातळी २४५.५० मीटर निश्चित करण्यात आली आहे. सध्या नदीची पाणीपातळी २४३.१८ मीटर असून ती इशारा पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे सध्या पूरस्थिती नसली तरी धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांनी विनाकारण नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन..
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून नदी, धरण आणि पूरस्थितीबाबतची अद्ययावत माहिती नियमितपणे तपासण्यास सांगितले आहे.
