भंडारा: अवकाळी शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासन कामाला लागले असले तरी प्रशासनातील काही कर्मचारी मात्र साहेबी थाटातच आहेत. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात न जाता शेताच्या धुऱ्यावरूनच एक किलोमीटर पर्यंतचा सर्वे करण्याचा प्रताप हे कर्मचारी करीत असून अशा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला समोर जावे लागत आहे.
सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेतातील धानाचे पीक उध्वस्त झाले आहे. हे पीक पाहून आधीच शेतकरी गर्भगळीत झाला असताना त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेतील काही कर्मचारी करीत आहेत. झालेल्या नुकसानीनंतर पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी शेतात गेले. आता नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. तलाठी आणि कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हे सर्वेक्षण होत असताना हे कर्मचारी मात्र केवळ सर्वेक्षणाची खानापूर ते करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणी न जाता एक किलोमीटर पर्यंतचे सर्वेक्षण शेताच्या एखाद्या धुर्यावर उभे राहून हे दिव्य दृष्टी असलेले कर्मचारी करतात. त्यामुळे खरोखरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हा प्रश्नच आहे.
भंडारा तालुक्यातील गुंथारा परिसरात तलाठ्याकडून असाच प्रकार सुरू होता. त्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते व परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना करताच त्या ठिकाणी येऊन योग्य त्या सूचना दिल्या. कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. कामाची केवळ औपचारिकता करण्याच्या नादात हे कर्मचारी शेतकऱ्यांचे नुकसान करून करून बसणार असतील तर मात्र यंत्रणाच बाधक ठरू पाहते, असे म्हणता येईल. या कर्मचाऱ्यांनी वेळेत स्वतःला आवरले नाही तर आधीच नुकसानीमुळे विवंचनेत असलेला शेतकरी आपला संयम गमावून बसेल यात शंका नाही.
हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : बांते
शेतकरी चारही बाजूने अडचणीत आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरवला आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. शासनाची मदतीची मानसिकता असली तरी त्यासाठी स्थानिक स्तरावरून जाणारा अहवाल तेवढाच महत्त्वाचा असतो. सर्वेक्षण करताना अशा पद्धतीने पाट्या टाकण्याचे काम होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशा शब्दात होणारे सर्वेक्षण हे सांगोपांग आणि कुठल्याही भेदभावाशिवाय व्हावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद बांते यांनी केली आहे.
