नागपूर : दोघांचा बळी आणि एकाला जखमी करणाऱ्या जखमी आणि लंगडणाऱ्या वाघिणीच्या शोधासाठी वनखात्याने तब्बल ४० कॅमेरा ट्रॅप, चार ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली. विभागाचे सुमारे १०० कर्मचारी तिच्या मागावर आहेत. मात्र, वाघीण प्रत्येकवेळी हुलकावणी देऊन जात आहे.
वाघिणीचा शोध का ?
भंडारा जिल्ह्यातील या वाघिणीने १५ दिवसात तीन ग्रामस्थांवर हल्ला केला. १९ मार्च रोजी बाम्पेवाडा येथे वसंता मेश्राम यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. २८ मार्चला उमरझरी येथे माया सोनवणे यांच्यावर हल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. तर १ एप्रिलला आमगाव खुर्द येथे शेतात काम करणाऱ्या छाय मुंगमोडे यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये रोष असल्याने वन्यजीव आणि प्रादेशिक वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न
दोघांचा बळी आणि एकाला गंभीर जखमी करणाऱ्या वाघिणीला पकडण्यासाठी या परिसरात वनखात्याच्या तब्बल १०० कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. आळीपाळीने हे कर्मचारी काम करत आहेत. वाघिणीचा वावर असलेल्या परिसरात तब्बल ४० कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. त्यातील काही कॅमेरे लाईव्ह आहेत. तर चार ड्रोनच्या साहाय्याने वाघिणीचा मागोवा घेतला जात आहे. मात्र आतापर्यंत एकाही कॅमेऱ्यात तिचे छायाचित्र आलेले नाही.
जखमी, लंगडी असूनही हुलकावणी
ही वाघीण जखमी झाल्यामुळे तिला नीट चालता येत नाही. ती लंगडत असल्याने तिला शिकार सहजतेने करता येत नाही आणि त्यामुळे गावाजवळ फिरत सहज शिकार मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शिकार मिळत नसल्यामुळे वाघीण सैरभैर झाली आहे. त्यामुळे तिच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अडचणी येत आहेत. दरम्यान, या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. शुक्रवारी महाराष्ट्र कांग्रेस नेते नाना पटोले यांनी भेट देऊन नेमकी परिस्थिती जाणून घेतली. तसेच वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या.
वनविभागाचे कोंबिंग ऑपरेशन
या वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्या प्रत्येक तुकडीत वनविभागाचेच नेमबाज आहेत. विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान जंगलात गस्त घालत आहेत. जंगलाच्या सीमेवर वनविभागाच्या चमू आहेत. वाघीण शिकारीवर यावी आणि तिला जेरबंद करता यावे म्हणून जंगलात शिकारीसाठी जनावरे बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणांवर पिंजरे लावण्यात आले असून मचाण उभारण्यात आल्या आहेत आणि त्यावर खात्याचे कर्मचारी आहेत. आतापर्यंत सुमारे ६०० हेक्टर जंगलाची टेहाळणी करण्यात आली आहे. जोडीला कॅमेरेही लावण्यात आले तरी वाघीण हुलकावणी देत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे.
ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन
वनविभागाने गावकऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले आहे. जंगलात किंवा जंगलालागतच्या भागात एकटे न फिरता समूहाने फिरावे, आवाज करणे, रात्री बाहेर जाणे टाळणे, अशा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. एकीकडे वाघिणीचा शोध सुरू असताना ग्रामस्थांच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. व्याघ्रहल्ल्याच्या घटनांमुळे त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
