भंडारा : शेकडो गायींचा धावता कळप अंगावरून जात असताना जमिनीवर निश्चल पडून राहणे, हे ऐकतानाही अंगावर काटा आणणारे दृश्य! मात्र भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या जांभोरा गावात दिवाळी पाडव्याला हा थरार दरवर्षी अनुभवायला मिळतो. गोधनाच्या पूजेबरोबरच गुराख्याच्या सेवेला मानाचा मुजरा करणारी सुमारे तीनशे वर्षांची ही परंपरा आजही गावकऱ्यांनी तितक्याच श्रद्धेने जिवंत ठेवली आहे.
शेती, पशुधन आणि गुराखी यांचे नाते केवळ उपजीविकेपुरते मर्यादित नसून ग्रामीण जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. वर्षभर गावातील गोधनाची काळजी घेणाऱ्या गुराख्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जांभोऱ्यातील ही पद्धत त्यामुळेच इतरांपेक्षा वेगळी ठरते. आधुनिक शेतीत बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली, गोधनाची संख्या घटली, पण जांभोरा गावाने आपल्या परंपरेची नाळ तुटू दिलेली नाही.
भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावात मागील ३०० वर्षांपासून अनोख्या पद्धतीने गोधन पूजा केली जाते.
बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवारी समाजातील परतेती कुटुंबीय आपले गोधन जंगलातून परत आणून गावभर प्रदक्षिणा घालतात.
यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ग्रामस्थ नृत्य करीत या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करतात.
या अनोख्या परंपरेनुसार गुराख्याच्या अंगावरून संपूर्ण गोधन चालवलं जातं, हे सर्व प्रायश्चित्त आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. ही अनोखी आणि पारंपरिक गोधन पूजा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
गोधनाची सजावट, पूजन आणि मिरवणूक
बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळपासूनच गावात उत्सवाची लगबग सुरू होते. गायींना नदी किंवा तलावावर नेऊन स्नान घातले जाते. शिंगांना रंग, गळ्यात घुंगरू, मोरपिसे आणि आकर्षक सजावटीने त्यांना नटविले जाते. पूजा-अर्चा करून खीर आणि गोडधोडाचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर ग्रामदैवतांचे दर्शन घेत गुराखी गोधनासह गावच्या चौकात दाखल होतो. वाद्यांच्या गजरात शेकडो गायींचा कळप चौकात जमा होतो.
क्षणभर श्वास रोखणारा थरार!
या सोहळ्यातील सर्वांत वेगळा क्षण म्हणजे गुराख्याच्या अंगावरून गायींचा कळप धावण्याची प्रथा. परतेकी कुटुंबातील गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि शेकडो गायी त्याच्या अंगावरून धावत पुढे जातात. हा प्रसंग पाहताना उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकतो. घरांच्या अंगणात शेणापासून तयार केलेली गोधनाची प्रतीकात्मक रचना कळपाच्या पायाखाली तुडवली जाणेही शुभ मानले जाते.
गोधन घटले, गुराख्याची परंपरा टिकली
पूर्वी जांभोऱ्यात सुमारे बाराशे गायी होत्या. परतेकी आणि शहारे या दोन कुटुंबांकडे प्रत्येकी पाचशे ते सहाशे गायींच्या राखणीची जबाबदारी होती. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शहारे कुटुंबाने हे काम सोडले. परतेकी कुटुंबाने मात्र परंपरा सुरू ठेवली.
सध्या गावात केवळ १०० ते १५० गायी उरल्या आहेत. विनायक सुरेश परतेकी (३९) हे वडिलांच्या निधनानंतर या परंपरेची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र गुरे राखण्याच्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने ते मजुरीही करतात. त्यांची आई आजही गुरे राखण्याचे काम करते. ‘गोमातेच्या चरणधुळीने वर्षभर संकटांपासून रक्षण होते. आजोबा-पणजोबांपासून ही परंपरा सुरू आहे. गोधनाने आमच्या पिढ्यांचे पालनपोषण केले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे,’ असे विनायक सांगतात.
गोधन कमी झाले, गुराख्याच्या व्यवसायाला आर्थिक आधार उरला नाही; तरीही जांभोऱ्यातील ही परंपरा टिकून आहे. कारण येथे गायींचा कळप केवळ अंगावरून धावत नाही, तर तीनशे वर्षांच्या संस्कृतीचा वारसाही पुढे घेऊन जातो.
