भंडारा: रंगपंचमीच्या सणाला सर्वत्र रंगांची उधळण होत असताना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एक गाव याला अपवाद ठरते. या गावात रंगांऐवजी चक्क कचऱ्याची होळी केली जाते आणि धुळवडीला रंग खेळले जात नाहीत. जिल्ह्यात असे एक गाव आहे, जिथे गेल्या ३४ वर्षांपासून होळी पेटवली जात नाही आणि रंगांची उधळणही केली जात नाही. मात्र रंगाचा सण भक्तिरंगात रंगून साजरा करत असतात.
हिंदू धर्मात होळीच्या सणाला वेगळेच महत्त्व आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी, साखरेची गोड गाठी आणि धूलिवंदनाच्या दिवरी एकमेकांवर रंगांची उधळण करून सर्वजण मौजमजा करतात. परंतु, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गवराळा हे गाव जिल्ह्यासह महाराष्ट्रमध्ये सर्वांनाच अपवाद ठरले आहे. होळी व रंग न खेळणारे म्हणून गवराळा गाव सर्व परिचित आहे. या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा गावातील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम आणि या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा किसनबाबा अवसरे महाराज यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि धार्मिक वृत्तीमुळे ते परिसरात प्रचंड प्रसिद्ध होते.
अशा या श्रमप्रतीष्ठेला चालणा देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे १९ मार्च १९९२ रोजी निधन झाले. त्यांचा निधन झाले तो दिवस होळीचा होता. त्यावेळी त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. त्यामुळेब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव येथील तेव्हापासूनच गवराळा गावातील नागरिकांनी या पुढे आपल्या गावात होळी साजरी न करण्याचा संकल्प घेतला आहे.
त्या दिवसापासून किसन बाबा अवसरे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतीत रंग न खेळता सामाजिक उपक्रम राबविले जातात. धुळवडीच्या दिवशी भक्ती सागरात रंगण्याची परंपरा या गवराळा गावाने मागील ३४ वर्षापासून अविरत जोपासली आहे. किशन अवसरे बाबा महाराजांनी संपूर्ण जीवन या गावासाठी समर्पित केले. गावात सामाजिक, धार्मिक, राजकीय सौख्य राहावे, यासाठी प्रयत्नशील होते. यातूनच अवसरे महाराजांविषयी गावकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली होती.
नेमके काय झाले..
१९९२ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी २ फेब्रुवारीला अवसरे महाराजांनी प्रभातफेरी काढून ५०० रुपयांची वर्गणी गोळा केली. दुपारी वाजतानंतर महाराज मंदिरात आले. सव्वा चार वाजताच्या दरम्यान त्यांचे देहावसान झाले. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या गावकऱ्यांनी कधीही रंगपंचमी न करण्याचा निर्णय घेतला.
लाकडाची नाही तर कचऱ्याची होळी..
होळीच्या दिवशी कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे पुण्यतिथी महोत्सव तर रंगपंचमीच्या दिवशी गोपालकाला आयोजित केला जातो. गावात आजही होळी जाळली जात नाही. परंतु, लाकडांची होळी पेटत नाही तर ग्रामसफाई करून गोळा केलेल्या केरकचऱ्याची होळी पेटते. गावातील कचऱ्यासोबत वाईट विचारसुद्धा येथील गावकऱ्यांनी जाळले आहेत असे गावकऱ्याचे मत आहे.
