भंडारा : पोळ्याच्या पाडव्याची पहाट भंडारा जिल्ह्यासाठी काळरात्र ठरली. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची भीषण धडक होऊन आठ मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे छत्तीसगडमधील मजूर असल्याची माहिती आहे.
लाखनी तालुक्यातील साकोली लाखनी राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळील भाऊ ढाब्याच्या परिसरात आज पहाटे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गालगतच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून एक ट्रक नागपूरच्या दिशेने निघाला होता. हा ट्रक महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने ट्रकला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला. वाहनातील मजूर अक्षरशः मृत्यूच्या जबड्यात सापडले.
या पिकअपमधून सुमारे ११ ते १२ मजूर प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी धावपळ उडाली.
भरधाव वेग ठरला काळ?
पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मात्र, अपघातामागील नेमके कारण काय, वाहनाचा वेग किती होता आणि पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मजूर होते का, याचा तपास महामार्ग पोलीस करीत आहेत.
सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. रोजीरोटीसाठी प्रवास करणाऱ्या मजुरांच्या वाटेवरच काळाने घाला घातल्याने छत्तीसगडमधील त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वेग, वाहनचालकांची बेदरकारपणा आणि प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
