भंडारा : एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची झळ, तर दुसरीकडे धान वाचविण्यासाठी ज्या विजेवर शेतकरी अवलंबून आहे, तीच वीज वारंवार खंडित होत असल्याने लाखनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पिकाला देण्यासाठी पाणी नाही आणि उपलब्ध पाणी शेतात सोडण्यासाठी वीज नाही, अशी कोंडी सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यातच ढिवरवाडा येथील शेतकरी प्रदीप खगार यांच्या शेतातील डीपी (रोहित्र) वारंवार जळत असल्याची तक्रार समोर आली आहे. गणेश चतुर्थीच्या काळात नवीन डीपी बसवून दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तोही जळाल्याचा दावा खगार यांनी केला आहे.
लाखनी तालुका भंडारा जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट आहे. पावसाने ओढ दिल्याने धानाचे पीक संकटात आले आहे. सध्या धान गर्भावस्थेत असल्याने पिकाला पाण्याची गरज वाढली आहे. पावसाचा भरवसा नसल्याने शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातून पाणी देऊन उभे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वीजपुरवठा करणारा डीपीच वारंवार जळत असल्याने सिंचनाचे गणित कोलमडले आहे.
२०२१ पासून पाच वेळा डीपी जळल्याचा दावा
प्रदीप खगार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतातील डीपी २०२१ पासून आतापर्यंत पाच वेळा जळाला आहे. प्रत्येक वेळी डीपीच्या बिघाडामुळे शेतातील सिंचन व्यवस्था ठप्प होते. गणेश चतुर्थीच्या काळात महावितरणकडून नवीन डीपी बसवून देण्यात आला; मात्र अवघ्या दोन दिवसांत तोही जळाल्याचे खगार यांनी सांगितले.
“आमच्या शेतातील डीपी २०२१ पासून आतापर्यंत पाच वेळा जळला आहे. गणेश चतुर्थीच्या काळात नवीन डीपी लावून देण्यात आला; मात्र दोन दिवसांत तोही जळाला. महावितरणकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर तक्रार अर्ज स्वीकारला जात नाही. ऑनलाइन तक्रार झाली आहे, आता वारंवार येऊ नका, असे सांगितले जाते. या प्रकारामुळे माझ्या धानाचे दोन वेळा नुकसान झाले आहे. १६ केव्हीचा डीपी वारंवार जळत असेल तर शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा डीपी बसवून द्यावा,” अशी मागणी प्रदीप खगार यांनी केली.
डीपी का जळतो? महावितरणकडून तपासणी..
दरम्यान, तक्रारीची दखल घेऊन नवीन डीपी बसविण्यात आला होता. मात्र तोही जळाल्याची माहिती मिळाल्यानंतर डीपी वारंवार जळण्यामागील कारण शोधण्यासाठी तपासणी केली जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
“ढिवरवाडा येथील शेतकऱ्याचा अर्ज आमच्याकडे आला होता. त्यांच्या शेतातील डीपी वारंवार जळत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानुसार नवीन डीपी लावून देण्यात आला. मात्र नवीन डीपीदेखील जळत असल्याची तक्रार पुन्हा करण्यात आली आहे. त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करण्यात आला असून वरिष्ठ कार्यालयालाही माहिती देण्यात आली आहे. डीपी नेमका का जळत आहे, याची पूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर डीपी बदलून देण्यात येईल,” अशी माहिती सुधीर कुंभारे, अभियंता, महावितरण यांनी दिली.
दुष्काळाच्या काळात पिकाला पाणी देणे हीच शेतकऱ्यांची सर्वात मोठी धडपड असताना सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठाच वारंवार खंडित होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. पावसाने पाणी रोखले आणि डीपीने वीज; अशा दुहेरी संकटात गर्भावस्थेतील धान वाचविण्याची लाखनीतील शेतकऱ्यांची लढाई सुरू आहे.
