भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली गावात रविवारी (६ जुलै) सकाळी घडलेल्या एका घटनेने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. स्थानिक शेतकरी पटले हे सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता, शेतातील विहिरीत काहीतरी हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर विहिरीत बिबट्याची दोन लहान बछडे पडल्याचे त्यांना दिसले.

आव्हानात्मक बचावमोहीम

परिसरात मादी बिबट असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने गावकऱ्यांना आणि वनविभागाला माहिती दिली. ही बातमी गावात क्षणार्धात पसरली आणि विहिरीजवळ नागरिकांची मोठी गर्दी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे पथक आवश्यक बचाव साहित्य आणि उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पाणी असल्याने आणि बछडे अतिशय लहान असल्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे वन कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, कोणतीही घाई न करता नियोजनबद्ध आणि सावध पद्धतीने बचावमोहीम राबविण्यात आली.

सुदैवाने गंभीर दुखापत नाही

वनकर्मचाऱ्यांनी विशेष जाळीच्या साहाय्याने दोन्ही बछड्यांना एकामागून एक सुखरूप विहिरीबाहेर काढले. रेस्क्यू मोहीम यशस्वी होताच उपस्थित नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर वनविभागाच्या वैद्यकीय पथकाने दोन्ही बछड्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. सुदैवाने दोन्ही बछडे सुरक्षित असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.

मादी बिबटचा शोध सुरू

वनअधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे बछडे अत्यंत लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईची तातडीने गरज आहे. त्यामुळे परिसरात मादी बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. योग्य संधी मिळताच या दोन्ही बछड्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आणि मादीच्या सान्निध्यात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, बछडे हरवल्यानंतर मादी बिबट परिसरात फिरण्याची किंवा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी जंगलालगतच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.