भंडारा : जादूटोणा केल्याच्या केवळ संशयातून एका ६५ वर्षीय वृद्धावर निर्घृणपणे प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील मासल येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले बळराम लांजेवार यांचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारादरम्यान गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लाखांदूर पोलिसांनी आधीच अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई अधिक कठोर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासल येथील रहिवासी बळराम लांजेवार (वय ६५) यांच्यावर शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर जादूटोणा केल्याचा संशय आरोपींनी घेतला होता. याच कारणावरून ३० जुलै रोजी संतप्त झालेल्या चार जणांनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी व मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बळराम लांजेवार गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी वृद्धाला प्रथम लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले होते.
आठवडाभर मृत्यूशी झुंज; अखेर प्राणज्योत मालवली
गेल्या आठवडाभरापासून नागपूर येथे उपचार सुरू असताना बळराम लांजेवार यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी (६ ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून पोलिसांनी आरोपींविरुद्धच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे.या प्रकरणी पीडिताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाळ लांजेवार (वय ४५), विवेक लांजेवार (वय २५), प्रमोद लांजेवार (वय ४०) आणि किशोर लांजेवार (वय ४०, सर्व रा. मासल) यांना तत्काळ अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
कोठडीची मुदत संपल्यानंतर चौघांनाही न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवाना करण्यात आले आहे. वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने लाखांदूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत. जादूटोण्याच्या अंधश्रद्धेतून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
