भंडारा : भंडाऱ्याचे लोकसभा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोसेखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांवर सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध दिल्लीमध्ये ठाम भूमिका घेत आज लोकसभेच्या पायऱ्यांवर शांततामय आंदोलन केले. विशेष बाब म्हणजे, अधिवेशन काळातून निलंबित असतानाही त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आपला संघर्ष सुरू ठेवला आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे हजारो शेतकरी, आदिवासी व सामान्य नागरिक विस्थापित झाले आहेत. मात्र, अनेक वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, पुनर्वसन, रोजगार आणि मूलभूत सुविधांचा लाभ मिळालेला नाही. या गंभीर अन्यायाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. पडोळे यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत सरकारच्या उदासीनतेचा तीव्र निषेध केला.
यावेळी बोलताना डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की,
“गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा केवळ भंडारा-गोंदियाचा नाही, तर देशातील विस्थापितांच्या वेदनांचे प्रतीक आहे. मला निलंबित केले असले तरी माझा आवाज दाबता येणार नाही. जनतेसाठी बोलणे हा माझा अधिकार आणि कर्तव्य आहे. अन्याय दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहील.”
सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करावे, प्रलंबित मोबदला व्याजासह देण्यात यावा, तसेच पुनर्वसनाच्या सर्व तरतुदी अंमलात आणाव्यात, अशी ठाम मागणी केली.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या या आंदोलनामुळे संसद परिसरात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाला नव्याने राष्ट्रीय पातळीवर वाचा फुटली असून, जनतेच्या हक्कांसाठी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता लढणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

