भंडारा : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात दोन जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आखलेली ‘भक्ष्यांची रणनीती’ अपयशी ठरताना दिसत आहे. आठ भक्ष्यांचा सापळा रचूनही वाघीण सापडत नसल्याने वनकर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे. त्यातच वाघिणीच्या शोध मोहिमेत आता ‘बिबट्याच्या एंट्री’ने नवीनच अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, सापळ्यातील दोन भक्ष्यांवर बिबट्यानेच ताव मारल्याने संपूर्ण मोहिमेत अनपेक्षित वळण आले आहे. त्यामुळे आता वाघीण ‘हाताबाहेर’ आणि बिबट्याची मेजवानी सुरू झाली असून ‘ऑपरेशन वाघीण’ फ्लॉप ठरणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
गुंतागुंत वाढली
नवेगाव नागझिऱ्यातली ही चतुर वाघीण वनविभागाला चकवा देत असल्याने ‘ऑपरेशन वाघीण’ अडखळले आहे. एकीकडे वाघीण हुलकावणे देत असताना त्याच परिसरात बिबट्याच्या एंट्रीने वनविभागाची डोकेदुखी मात्र वाढवली आहे. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी तब्बल आठ ठिकाणी रेडकू, बकरे आदी भक्षांची ‘मेजवानी’ ठेवण्यात आली. मात्र, अपेक्षेप्रमाणे वाघीण या सापळ्याकडे आकर्षित होत नसल्याने मोहिमेची गुंतागुंत वाढली आहे. वाघीण वनविभागाच्या १७० हून अधिक कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून अक्षरशः सळो की पळो करून सोडत आहे.
दोन भक्ष बिबट्याने केले फस्त
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सुरू केलेली मोहीम अद्याप यशस्वी ठरलेली नाही. दरम्यान, वाघिणीसाठी ठेवलेल्या भक्षांपैकी दोन भक्ष्यांवर बिबट्यानेच डल्ला मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनविभागाची मोहीम आणखी आव्हानात्मक बनली आहे. उमरझरी येथील मायाताई सोनवाणे यांच्यावर हल्ला होण्याच्या तीन दिवसांपूर्वी ही वाघीण उमरझरी-बाम्पेवाडा मार्गावर दिसली होती. काही नागरिकांनी तिचा व्हिडिओ काढून समाजमाध्यमांवर व्हायरल केला. त्यानंतर वाघीण जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली.
वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) अधिकाऱ्यांनी यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव मागितला. उमरझरीच्या सरपंच सुनीता राजेश हटवार व ग्रामसेवक करण चव्हाण यांनी पुढाकार घेत आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, तोपर्यंत वाघिणीने दुसरा बळी घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. २८ मार्चच्या घटनेनंतर एफडीसीएम, प्रादेशिक विभाग आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी तत्काळ अलर्ट झाले. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९० कॅमेरे बसविण्यात आले असून, विविध ठिकाणी भक्ष्य ठेवून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भक्ष्य का ठेवतात?
लंगडी (अपंग) असलेली ही वाघीण भुकेच्या वेळी सहज उपलब्ध भक्ष्याचा शोध घेते. भक्ष्य खाल्ल्यानंतर ती पुन्हा त्याच ठिकाणी परत येण्याची शक्यता असते. याचवेळी मचाणावरून डार्ट गनद्वारे तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याची योजना वनविभागाने आखली आहे.
एसटीपीएफच्या तुकड्या तैनात
विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) ३०-३०-३० अशा तीन तुकड्या कार्यरत असून, आमगाव, घानोड, बाम्पेवाडा, शिवणटोला, उमरझरी, आतेगाव व निपरटोला परिसरात गस्त घालत आहेत. गावकऱ्यांमध्ये जनजागृती, सतर्कतेचे संदेश आणि मुखवटे वाटप अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत.
आरआरटीचे ३० जवान सज्ज
त्वरित प्रतिसाद पथक (आरआरटी) चे ३० जवान २४ तास सज्ज असून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, आपत्कालीन मदत करणे आणि आवश्यकतेनुसार परिस्थिती नियंत्रणात आणणे हे त्यांचे प्रमुख काम आहे.
“वाघ हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. तो केवळ विपरीत परिस्थितीतच हल्ला करतो. संबंधित वाघिणीला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी संयम राखावा.”
– प्रीतमसिंग कोडापे, उपसंचालक, एनएनटीआर
