भंडारा : जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. गेट क्रमांक ६ जवळील झुडपांमध्ये वाघ दिसल्याची माहिती काही वाहनचालकांनी दिल्यानंतर त्याचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, चर्चांना उधाण
प्रत्यक्षदर्शींनी वाघ झुडपांमध्ये वावरताना पाहिल्यानंतर ही माहिती वेगाने पसरली. आयुध निर्माणीच्या सुरक्षा भिंतीलगत असलेल्या पाणवठ्याजवळही वाघाचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कारखान्यातील कर्मचारी तसेच सालेबर्डी, सावली आणि जवळील गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
वनविभागाची तातडीची शोधमोहीम..
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी पथके पाठवून परिसरात शोधमोहीम सुरू केली. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे तसेच जंगलालगतच्या भागात विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. वनकर्मचाऱ्यांनी वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवत परिसरात गस्त वाढविली.
वाघाला सुरक्षितपणे जेरबंद..
वनविभागाच्या नियोजनबद्ध आणि दक्ष कारवाईमुळे अखेर संबंधित पट्टेदार वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले. या कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी अथवा अनुचित घटना घडली नाही. वनविभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांमध्ये दिलासा, सतर्क राहण्याचे आवाहन..
मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वाघाला जेरबंद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, वनविभागाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतेही वन्यप्राणी दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याचे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
