भंडारा : जिल्ह्यात साकोली, पवनी, तुमसर तालुक्यात वाघांची प्रचंड दहशत आहे. वाघ केव्हाही हल्ला करत असल्याने गावात राहणंही अवघड झालं. मात्र वाघाचे हल्ले परतवून लावण्यासाठी पवनी वनपरिक्षेत्रात काही अधिकार्यांनी अशी काही भन्नाट युक्ती शोधून काढली की, वाघही आता कन्फ्युज झाले आहेत. वाघांना भुलविण्यासाठी वन विभागाने केलेल्या प्रयोग यशस्वीही झाला. चेहऱ्यामागे चेहरा अर्थात मुखवटा लावण्याची वनविभागाची ही शक्कल केवळ कल्पकता नसून मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना कमी करण्यासाठी उचललेले अत्यंत यशस्वी पाऊल आहे.
पवनी मॉडेल चर्चेत
मागील काही दिवसांत साकोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वाघाचे हल्ले रोखण्यासाठी किंवा ते परतवून लावण्यासाठी काय करता येईल यावर विचार मंथन सुरू झाले असतानाच भंडारा जिल्ह्यातील “पवनी मॉडेल” आता चर्चेला आले आहे.
दोन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकही मृत्यू नाही
पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यांमुळे जीवितहानी होत असताना वनविभागाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. माणसाच्या डोक्याच्या मागील बाजूस मानवी मुखवटा लावण्याची प्रथा! वाघ साधारणपणे मागून हल्ला करतो हे ओळखून, गावकरी डोक्याच्या मागच्या बाजूला माणसाच्या चेहऱ्याचे मुखवटे लावून फिरत आहेत. यामुळे वाघाला समोरून आणि मागून दोन्ही बाजूंनी माणूस आपल्याकडेच पाहत असल्याचा भास होतो.
प्रामुख्याने शेतात काम करताना किंवा जंगलाच्या कडेला जाताना ग्रामस्थ हे मुखवटे वापरत आहेत, जेणेकरून वाघाला चकवा देता येईल. या साध्या पण कल्पक प्रयोगामुळे गेल्या दोन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
तंत्रज्ञान आणि साध्या उपायांचा मेळ
उमरेड-करांडला अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या लक्षणीय आहे. उन्हाळ्यात मोहफुल वेचण्यासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर वाघाचे हल्ले होणे ही गंभीर समस्या होती. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरवर्षी २ ते ३ जणांचा बळी जात होता. मात्र वनपरिक्षेत्राधिकारी वृषाली नागदेवे यांची ही संकल्पना वाघाचे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी ठरली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे तंत्रज्ञान आणि साध्या उपायांचा मेळ घालून जीव वाचवता येतात हे सिद्ध झाले.
सुंदरबनची कल्पना, पवनीत यशस्वी प्रयोग
पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्ये वाघांपासून बचावासाठी वापरली जाणारी ही ‘मास्क’ पद्धत आता महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या पवनी (पवनीत) परिसरात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. सुंदरबन परिसरात मध गोळा करणारे लोक वाघाच्या हल्ल्यांपासून बचावासाठी डोक्याच्या मागे मानवी मुखवटे लावतात. याच संकल्पनेवर आधारित प्रयोग पवनीत राबविण्यात आला.
१००० ते १५०० मुखवटे वाटप
मोहफुल हंगामात जंगलात जाणाऱ्या नागरिकांना पवनी वनविभागाने मानवी मुखवटे आणि मेगाफोन वितरित केले. यंदा सुमारे ७०० मुखवटे वाटप करण्यात आले असून, मागील दोन वर्षांत एकूण १००० ते १५०० मुखवटे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
वाघाची ‘शिकारीची मानसिकता’ बदलली!.
वाघ हा सहसा दबा धरून मागून हल्ला करणारा प्राणी आहे. जेव्हा त्याला समोरून कोणी पाहत आहे असे वाटते, तेव्हा तो आपली ‘सरप्राईज अटॅक’ची संधी गमावल्याचे समजतो. मोहफुल वेचताना माणूस वाकून काम करत असल्याने तो वाघासाठी सहज शिकार ठरतो. मात्र डोक्याच्या मागे मानवी चेहऱ्याचा मुखवटा असल्यामुळे वाघ गोंधळात पडतो आणि हल्ला टाळतो. या साध्या उपायामुळे वाघाची ‘शिकारीची मानसिकता’ बदलल्याचे दिसून आले आहे.
‘पवनी मॉडेल’ची राज्यभर चर्चा
या यशस्वी प्रयोगामुळे ‘पवनी मॉडेल’ म्हणून ओळख निर्माण झाली असून, नागपूर वनपरिक्षेत्रातही या उपक्रमाची दखल घेतली जात आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
जनजागृतीवरही भर
वनपरिक्षेत्राधिकारी वृषाली नागदेवे यांनी सांगितले की, मानव आणि प्राणी यांच्या वर्तनावर काम केल्यास संघर्ष टाळता येतो. मुखवट्याचा प्रयोग प्रभावी ठरत असून, नागरिकांमध्ये जनजागृती करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. एक साधा मुखवटा पण परिणाम मात्र जीव वाचवणारा! पवनी वनपरिक्षेत्रातील हा प्रयोग केवळ नावीन्यपूर्ण नाही, तर मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. वनविभागाकडून जंगलात जाणाऱ्या नागरिकांना समूहाने जाणे, मेगाफोनचा वापर करणे अशा सूचना दिल्या जातात. तसेच जिंगल्स आणि सोशल मीडियावरील रिल्सद्वारे जनजागृती केली जात आहे. मोहफुल हंगामभर विशेष पथके गावागावात सक्रिय असतात.
हल्ला करण्याची पद्धत
– वाघ हा बसून काम करणाऱ्या माणसांवर हल्ला करत असल्याचे लक्षात आले
– लक्ष नसलेल्या व्यक्तींवर वाघ हल्ला करतो
– तुमचे लक्ष वाघाकडे असेल तर सहसा वाघ हल्ला करत नाही
– वाघाचा वावर असलेल्या ठिकाणी मुखवटे घालण्याचा प्रयोग करण्यात आला
– मुखवटे लावल्यानंतर वाघ हल्ला करत नसल्याचा प्रयोग यशस्वी झाला.
