भंडारा : भिलेवाडा-मांडवी ते करडी हा रस्ता दुरवस्थेमुळे जीवघेणा ठरत आहे. आजवर या रस्त्यामुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत, तर काहींना अपंगत्व आले आहे. वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे प्रशासन आणि बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने याकडे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि मांडवीचे उपसरपंच प्रभाकर सार्वे यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा आणि वाहनांचा ताफा अडवण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवण्यापूर्वीच कारधा पोलिसांनी पहाटेच प्रभाकर सार्वे यांना घरातून अटक केली. त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरीही सकाळीच छापे टाकण्यात आले.
केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज, ५ जुलैला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रस्त्यांच्या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मांडवी गावचे सरपंच प्रभाकर सार्वे यांनी नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवण्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी दडपशाहीचे धोरण राबवले आणि मला व माझ्या कुटुंबीयांना नाहक त्रास देत ताब्यात घेतले, असे प्रभाकर सार्वे यांनी सांगितले.
पोलिसांनी प्रभाकर सार्वे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या घरी सकाळीच धडक दिली, ही विशेष. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सार्वे हे रस्ता दुरुस्तीसाठी शासन दरबारी अनेक चकरा मारत आहेत. मागील अनेक वर्षापासून त्यांची प्रमुख मागणी होती की, सदर रस्ता अत्यंत खराब झाला असून हजारो नागरिक, विद्यार्थी व महिला या रस्त्याने जाणे येणे करतात. परंतु या मागणीकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले.
आंदोलन करणे हा भारतीयांचा घटनात्मक अधिकार आहे. परंतु मला घरातून अटक करून जिल्हा प्रशासनाने दडपशाहीचे धोरण अवलंबले आणि लोकशाहीची हत्या केली आहे. काल रात्रीपासूनच पोलिसांचा ससेमीरा माझ्या पाठीमागे लावण्यात आला. माझ्या कुटुंबातील सदस्यांना व मला पोलिसांनी नाहक त्रास दिला आहे, असा आरोप प्रभाकर सार्वे यांनी केला आहे. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा प्रभाकर सार्वे यांनी केली आहे.
रस्ता दुरुस्त करण्याचे काम करणे सोडून आंदोलन करणाऱ्यांना अटक करून प्रशासन काय साध्य करत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.