भंडारा : वाळूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत असताना टिप्पर चालकाने महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याच्या वाहनाला धडक देत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यातील पहेला–बोरगाव मार्गावर घडली. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टिप्पर मालक व चालकाला अटक केली आहे.
कारने टिप्परचा पाठलाग..
पवनी तालुक्यातील पहेला येथील मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहिर हे त्यांच्या महसूल सेवकासह गोलेवाडी येथे शासकीय कामासाठी जात असताना त्यांना एका टिप्परमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ टिप्पर थांबवून कारवाई सुरू केली. त्याचवेळी टिप्परचा मालक दुचाकीवरून घटनास्थळी आला व अधिकाऱ्याशी वाद घालत टिप्पर पळवून नेला.यावर मंडळ अधिकारी अहिर यांनी स्वतःच्या अल्टो कारने टिप्परचा पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान चालकाने रस्त्यावर ठिकठिकाणी वाळू टाकत अडथळे निर्माण केले. तसेच महसूल अधिकारी पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच टिप्परने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
टिप्पर जप्त..
तथापि, प्रसंगावधान राखत मंडळ अधिकारी अहिर यांनी धाडसाने टिप्परला अडवले व घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टिप्पर जप्त केला.
गुन्हा दाखल, दोघांना अटक..
या प्रकरणी टिप्पर मालक शुभम जिभकाटे (वय २७) व चालक अनंता सावरबांधे (वय २०) यांच्याविरोधात ओव्हरलोड वाळू वाहतूक, शासकीय कामात अडथळा, तसेच शासकीय अधिकाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचा वाढता बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासनासमोर कठोर कारवाईचे आव्हान उभे राहिले आहे.
