विदर्भातील एसटीचे भंडारा, साकोली हे दोनच आगार सुरू !

परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी वेतनवाढ जाहीर करत आंदोलकांना कामावर येण्याचे आवाहन केल्यावरही गुरूवारी अनेक कर्मचारी सेवेवर आले नाही.

कमी कर्मचाऱ्यांमुळे थोडय़ाच बस सुटल्या; नागपूरसह इतर आगारातून एकही बस निघाली नाही

नागपूर : परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी वेतनवाढ जाहीर करत आंदोलकांना कामावर येण्याचे आवाहन केल्यावरही गुरूवारी अनेक कर्मचारी सेवेवर आले नाही. त्यामुळे विदर्भातील भंडारा, साकोली या दोनच आगारातून निवडक बस सुटल्या. तर नागपूरसह इतर आगारात संपकरी आंदोलकांमुळे प्रवासी वाहतुक ठप्पच राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर राज्यात उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली असली तरी विदर्भात मात्र संपाचा प्रभाव जास्तच होता. त्यानंतरही विदर्भातील भंडारा आणि साकोली आगारातून एसटीच्या अधिकाऱ्यांना निवडक बस सोडण्यात यश मिळाले. दरम्यान नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरूवारी विविध आगार व कार्यालयांत जाऊन गटा- गटात आंदोलकांना वेतनवाढ समजावत समुपदेशनाचा प्रयत्न केला. त्यानंतरही कुणीही कामावर आले नाही. सेवेवर येणाऱ्यांच्या निलंबन रद्दची परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतरही हे कर्मचारी कामावर आले नाही.

दरम्यान अधिकाऱ्यांनी आंदोलकांना महामंडळाच्या सूचनेनुसार कामावर न आल्यास शुक्रवारपासून कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यानुसार आता शुक्रवारी सेवेवर येण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवा समाप्ती, फौजदारी गुन्हेसह इतरही कठोर गुन्हे दाखल होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने वर्तवली.

एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने विद्याार्थ्यांना शाळा, महाविद्याालयात जाण्यात अडचणी येत असून सामान्य प्रवाशांचेही हाल होत आहे. या सगळय़ांना प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करावे लागत आहे. दरम्यान गुरूवारी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करतांना अधिकाऱ्यांना ज्येष्ठ कर्मचारी काम सुरू करण्याचे संकेत देत असले तरी नवोदीत कर्मचारी मात्र संपावर ठाम असल्याचेही निदर्शनात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhandara sakoli depots st vidarbha ysh

ताज्या बातम्या