भंडारा : विद्यार्थ्यांच्या ताटात पोषणमूल्यांचा आहार देण्याच्या योजनेची अंमलबजावणी नेमकी किती गांभीर्याने होते, याचा धक्कादायक नमुना महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या पाहणीत समोर आला आहे. जिल्ह्यातील चार शाळांच्या शालेय पोषण आहाराची तपासणी करताना दोन शाळांच्या स्वयंपाकघरांमध्ये अस्वच्छतेसह चक्क उंदरांची विष्टा आढळली. विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार होणाऱ्या ठिकाणीच स्वच्छतेचा असा बोजवारा उडाल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयोगाने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पोषण देताना स्वच्छतेचा विसर?..
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. मात्र, ज्या स्वयंपाकघरातून हा आहार तयार होतो, त्याच ठिकाणी उंदरांची विष्टा आढळणे ही बाब केवळ अस्वच्छतेपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट निगडित आहे. अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी अधिकारी विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत पोहोचले; पण तपासणी करताना त्यांना स्वयंपाकघरातील अस्वच्छतेचे वास्तवही समोर आले.
अधिकाऱ्यांनीच चाखले विद्यार्थ्यांचे जेवण.
महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची चमूने भंडारा भंडारा जिल्ह्यातील शाळांच्या तपासणी दरम्यान तेथील अन्नाची चव चाखली. शालेय पोषण आहार, अंगणवाडीतील आहार तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शालेय पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी आयोगाच्या पथकाने जिल्ह्यातील चार शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण अधिकाऱ्यांनी स्वतः खाऊन पाहिले. जेवणाची गुणवत्ता, त्याची स्थिती, स्वच्छता तसेच आहार योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान दोन शाळांच्या किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि उंदरांची विष्टा आढळली. विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या अन्नाच्या ठिकाणीच अशी परिस्थिती असल्याने आयोगाच्या पथकाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. संबंधित यंत्रणेला याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
भंडारा : जिल्ह्यातील चार शाळांच्या शालेय पोषण आहाराची तपासणी करताना दोन शाळांच्या स्वयंपाकघरांमध्ये अस्वच्छतेसह चक्क उंदरांची विष्टा आढळली. विद्यार्थ्यांसाठी अन्न तयार होणाऱ्या ठिकाणीच स्वच्छतेचा असा बोजवारा उडाल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले… pic.twitter.com/HniXW0x5hs
— LoksattaLive (@LoksattaLive) September 3, 2026
अंगणवाडीपासून शिध्यापर्यंत पाहणी.
राज्य अन्न आयोगाच्या पथकाने केवळ शालेय पोषण आहाराचीच तपासणी केली नाही, तर अंगणवाडीच्या माध्यमातून चिमुकल्यांना दिला जाणारा आहार आणि अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याचीही पाहणी केली. ‘कोणताही लाभार्थी अन्नाच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि महाराष्ट्र भूकमुक्त झाला पाहिजे’, या उद्देशाने जिल्हानिहाय पाहणी करण्यात येत असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या पोषण आहाराच्या स्वयंपाकघरातच उंदराची विष्टा आढळल्याने आता संबंधितांवर केवळ कागदी कारवाई होते की प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
