भंडारा : तुमसर तालुक्यातील दावेझरी गावाजवळील चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला. जनावरे चारण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय गुराख्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला पत्नीच्या डोळ्यांसमोरच जंगलात फरफटत नेल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे दावेझरीसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावावर शोककळा पसरली आहे.
दावेझरी येथील रहिवासी बंशीलाल मेश्राम (५५) हे गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीसह गायी-म्हशी चरायला घेऊन चुल्हारडोह-आग्री जंगलात गेले होते. दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास जनावरे चरत असताना अचानक दाट झुडपातून वाघाने झडप घातली. काही क्षणांतच वाघाने बंशीलाल यांच्यावर हल्ला करून त्यांना आपल्या जबड्यात पकडले आणि जवळील डोंगराच्या दिशेने फरफटत नेण्यास सुरुवात केली.
ही संपूर्ण घटना त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांसमोर घडत होती. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे त्या पूर्णपणे हादरून गेल्या. पतीला वाचविण्याचा त्यांनी आर्त प्रयत्न केला, मोठ्याने आरडाओरड केली; मात्र वाघासमोर त्यांचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरला.
आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला मृत्यूच्या दाढेत जाताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आणि त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण जंगल दणाणून गेले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी गाव गाठून ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ही बातमी समजताच गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, वनविभागालाही याची माहिती देण्यात आली. वनअधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून जंगल परिसरात आणि डोंगराच्या दिशेने व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा मानव–वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये राहणारे शेतकरी आणि गुराखी रोज जीव धोक्यात घालून उपजीविकेसाठी जंगलात जात असतात. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या भागात तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बंशीलाल मेश्राम यांच्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजच्या कष्टातून संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका कष्टकरी गुराख्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण दावेझरी गाव शोकमग्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
