भंडारा : तुमसर वनपरिक्षेत्रातील गोबरवाहीजवळ मंगळवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या ५५ वर्षीय गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्याला मुलाच्या डोळ्यांसमोरच फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. वडिलांना वाचविण्यासाठी मुलाने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली; मात्र काही क्षणांतच वाघ त्यांना घेऊन दाट जंगलात अदृश्य झाला. या भीषण हल्ल्यात बेनीराम लक्ष्मण राऊत (५५) यांचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर गोबरवाहीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बचावाची संधीच मिळाली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, बेनीराम राऊत हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलगा विजय राऊत याच्यासह गावालगतच्या जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे एकच्या सुमारास दोघेही गावाजवळील नाल्याच्या परिसरात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बेनीराम राऊत यांच्यावर झडप घातली. हल्ला इतका अचानक झाला की त्यांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही.

मुलाच्या डोळ्यांसमोर वडिलांना फरफटत नेले

वाघाने बेनीराम राऊत यांना जबड्यात पकडून मुलगा विजयच्या डोळ्यांसमोरच जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. हा प्रकार पाहून विजयने मोठ्याने आरडाओरड केली; मात्र वाघाच्या आक्रमकतेपुढे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

ग्रामस्थांची धावपळ, वनविभागाची शोधमोहीम

गावात पोहोचताच विजयने घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि वनविभागालाही तातडीने कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तुमसर वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वीही वासरावर हल्ला

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका वासरावरही वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे या भागात वाघाचा वावर वाढल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी

जंगलालगतच्या गावांतील शेतकरी आणि गुराखे भयभीत झाले असून, वनविभागाने तातडीने गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे वन्यजीव-मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.