भंडारा : तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतीला जीवनदायी ठरणाऱ्या बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यातून अचानक पिवळसर, दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील उन्हाळी धान पिकांवर गंभीर संकट ओढावले आहे. ऐन ‘ओब्या’ अवस्थेत असलेल्या पिकांवर या दूषित पाण्याचा थेट परिणाम होत असून, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकारामागे अज्ञात उद्योगांकडून विषारी सांडपाणी कालव्यात सोडले जात असल्याचा संशय बळावत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कालव्यातून रसायनांचा मारा..
तुमसर परिसरातील शेतकऱ्यांसाठी बावनथडी प्रकल्प हा सिंचनाचा प्रमुख आधार मानला जातो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या कालव्यातून गडद पिवळसर रंगाचे, उग्र वास असलेले आणि रासायनिक घटकांनी युक्त पाणी वाहत असल्याचे चित्र समोर आले आहे. हे पाणी थेट शेतात पोहोचत असल्याने उभ्या धान पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ऐन बहरात धान पिकांवर विषारी वार..
सध्या उन्हाळी हंगामातील धान पिके ‘ओब्यांवर’ असून हा टप्पा उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा वेळी दूषित पाण्याचा मारा झाल्यास दाणे भर न येता ‘ पोकळ’ राहण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती येणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त होत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पर्यावरण आणि आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कालव्याचे पाणी पुढे नदी-नाल्यांमध्ये मिसळत असल्याने पाळीव प्राणी व वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला आहे. तसेच, रासायनिक घटक जमिनीत झिरपल्यास विहिरी व कूपनलिकांचे पाणीही भविष्यात दूषित होण्याचा धोका आहे.
प्रशासकीय दुर्लक्ष की अभय?
दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. “सिंचनासाठी स्वच्छ पाणी मिळणे अपेक्षित असताना कालव्यात विषारी पाणी येते कुठून?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. काहींनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप केला आहे. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून पीक जोपासले, मात्र आता शेवटच्या टप्प्यात प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे. “सिंचनासाठी शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित असताना सदर विषारी पिवळसर पाणी कालव्यात येते कुठून?” असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकऱ्यांनी विचारला आहे. बावनथडी प्रकल्प अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत तर नाही ? असाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या…
सदर कालव्यातील पाण्याचे नमुने तातडीने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी व सांडपाणी सोडणाऱ्या दोषी कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. सदर दूषित पाण्याचा विसर्ग थांबवून तातडीने स्वच्छ पाणी सोडण्यात यावे .बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची, दोषी उद्योगांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची, दूषित पाण्याचा प्रवाह थांबवून स्वच्छ पाणी सोडण्याची आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.आता बावनथडी प्रकल्प प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत बावनथडी प्रकल्प उपविभागाचे शाखा अभियंता आर. आर. बडोले यांनी, “प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्यात येत आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे सांगितले आहे.
