भंडारा : होळीच्या उत्साहावर विरजण घालणारी अत्यंत दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली . तुमसर-भंडारा मार्गावरील खापा खरबी फाट्याजवळ भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन त्यात ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन जण गंभीर जखमी आहेत.
सण-उत्सवाच्या काळात अशा घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुमसर येथील खापा चौक हे दोन महत्त्वाच्या महामार्गांचे (भंडारा-तुमसर-बपेरा आणि रामटेक-गोंदिया) संगमस्थान असल्याने तेथे अपघातांचा धोका वाढला आहे. होळीच्या दिवशी तुमसरकडून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या एका अतिवेगवान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात गोलू कांबळे यांचा बळी गेला . दुचाकीवरील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुमसरकडून भंडाऱ्याकडे जाणारी कार अत्यंत वेगाने होती, अपघात झाल्यानंतर माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी वेळेवर न पोहोचल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल ४ तास चक्का जाम आंदोलन केले. या जमावाने अपघातग्रस्त कारची तोडफोड केली, पोलीस प्रशासन उशिरा पोहोचल्याचा आरोप करत आपला संताप व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्थी करून योग्य मदतीचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत झाली.
सुरक्षेचा प्रश्न: या मार्गावर वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र रोष आहे. या रागातूनच गावकऱ्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवून चक्काजाम केला, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
वाहतुकीचा विळखा अन् बेशिस्तपणा…
खापा चौक हा एक महत्त्वाचा चौरस्ता आहे. येथे न दिशादर्शक फलक आहेत, न सिग्नल लाईटची व्यवस्था. यामुळे चारही दिशांनी येणारी वाहने नियमांची पायमल्ली करत सर्रास धावतात. चौकातील वाढते अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण होते. प्रशासकीय यंत्रणेचा धाक नसल्याने येथे छोटे-मोठे अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे. वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि शिस्तीचा अभाव यामुळे हा चौक मृत्यूचा सापळा बनला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या..
अपघातांचे वाढते सत्र पाहता परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनेची मागणी लावून धरली आहे. यामध्ये प्रामुख्याने चौकात तातडीने सिग्नल लाईट बसवावे. सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंगचे रेखांकन करावे. वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
