भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. तुमसर तालुक्यातील रोंघा येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नावेद (नवल) होलाराम खंडाते असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बारावीचा विद्यार्थी असून यंदा त्याने महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दिली होती. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात त्याला यश मिळू शकले नाही. निकाल समजताच तो मानसिकदृष्ट्या खचला होता. कुटुंबीयांनाही त्याच्या अस्वस्थतेची जाणीव होत होती; मात्र त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

शनिवारी दुपारच्या सुमारास नावेदने घरातून बाहेर पडून गावाजवळील शेत गाठले. तेथे करंजाच्या झाडाला गळफास लावून त्याने आपले जीवन संपविले. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिस हवालदार गणेश बांते या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मृत विद्यार्थ्याचे वडील गावाचे माजी उपसरपंच असल्याने या घटनेने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीच्या काळात मुलाने घेतलेल्या या निर्णयामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, निकाल हा आयुष्याचा शेवट नसून अपयशातूनही पुढे जाण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, तसेच पालकांनीही मुलांशी संवाद वाढवून त्यांना मानसिक आधार द्यावा, असे आवाहन प्रशासन व तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.