नागपूर : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला.गेल्या सहा दिवसांपासून या महिलेची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.
नागपूर येथे उपचार सुरू होते
भंडारा जिल्ह्यातील उमरझरी येथील शेत शिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर शनिवारी वाघाने परत हल्ला केला. या हल्ल्यात माया सोनवाने या महिला शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी महिलेला आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारसाठी पाठवण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून ती उपचार घेत होती. मात्र, गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनाक्रम नेमका काय
भंडारा जिल्ह्यातील जंगलव्याप्त उमरझरी येथे शनिवारी सकाळी दहा वाजता पट्टेदार वाघाने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, माया रामकृष्ण सोनावणे आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनावणे हे त्यांच्या शेतात हिरव्या मिरच्या तोडत होते. शेतालगतच्या जंगलातून एका पट्टेदार वाघाने अचानक माया सोनवाणे यांच्यावर हल्ला केला, तीक्ष्ण दातांनी मानेला पकडून १० फूट फरफटत नेले. हे पाहून पती रामकृष्ण सोनवणे यांनी आरडाओरडा केला.
शेजारच्या शेतात काम करणाऱ्या लोकांनी तात्काळ आरडा ओरड करून वाघाला पळवून लावले. उमरझरी येथील नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच माहेश्वरी नेवारे, मनोज बोरकर, यशवंत कापगते, सागर कापगते आणि इतर गावकरी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी माया सोनावणे यांना खाजगी चारचाकी ने साकोली उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गावकरी संतप्त का झाले ?
उमरझरी येथील या घटनेनंतर वनविभागाच्या विरोधात गावकऱ्यांचा असंतोष उफाळून आला. काही स्थानिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केल्यामुळे साकोली तालुक्यात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या आगीमुळे जंगलाचे किती नुकसान झाले हे अजून कळू शकले नाही. मात्र, या घटनेने गावकरी चांगलेच संतप्त झाले होते. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे राहणारे वसंत गणपत मेश्राम हे अंदाजे ५० वर्षाचे गावकरी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. मोहफुलाचा मोसम असल्याने सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास जंगलात गेले. मात्र, त्याचवेळी या जंगलात असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी ते मोहफुले वेचत होते. आपल्या आजूबाजूला वाघ असेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. शेतालगतच हे जंगल असून मोहफुले वेचताना वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
