भंडारा : भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवर “आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन” उभारण्यात येणार असल्याची घोषणा मोठ्या उत्साहात करण्यात आली होती. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे दावेही करण्यात आले होते. भूमिपूजन, बोट सफरी आणि विविध कार्यक्रमांमधून प्रकल्पाची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र सध्या नदीची स्थिती आणि प्रकल्पाच्या कामाचा वेग पाहता हा प्रकल्प जलपर्यटनाचा होता की जलपर्णी वाढीचा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
नदीवर जलपर्णीचं आक्रमण.. ..
ज्या नदीत जलपर्यटनाची संकल्पना मांडण्यात आली होती, त्या नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली दिसून येत आहे. काही भागांमध्ये नदीचा पृष्ठभाग हिरव्या थराने झाकल्याचे चित्र असून त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. काही स्थानिक नागरिकांच्या मते, नदी परिसरात दुर्गंधी, डासांचे प्रमाण आणि पर्यावरणीय समस्या वाढल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची दिसून येत आहे.
विकासाच्या दाव्यांवर प्रश्न..
या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. “भंडाऱ्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा” म्हणून या योजनेकडे पाहिले जात होते. मात्र प्रत्यक्ष कामाच्या गतीबाबत आणि सद्यस्थितीबाबत नागरिकांमध्ये असमाधान व्यक्त होत आहे. घोषणांमध्ये मांडण्यात आलेली उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष प्रगती यामध्ये तफावत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
आठ महिन्यांची मुदत; काम पूर्णत्वास केव्हा?.
२४ जून २०२४ रोजी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रकल्पाचा पहिला टप्पा अवघ्या आठ महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर बराच कालावधी लोटूनही अपेक्षित गतीने काम पूर्ण झाल्याचे चित्र दिसत नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासकीय प्रक्रियेबाबत चर्चा..
नगर परिषदेकडून सुरू असलेल्या काही कामांना जलसंपदा विभागाने स्थगिती दिल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित प्रशासकीय प्रक्रियाएँ आणि परवानग्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला सर्व आवश्यक मंजुरी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या का, याबाबत नागरिकांकडून माहिती जाणून घेण्याची मागणी केली जात आहे.
रोजगाराच्या अपेक्षा कायम..
या प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. “आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन” या संकल्पनेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीमुळे अपेक्षित परिणाम कधी दिसणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पाशी तुलना..
भंडाऱ्यातील काही नागरिक या प्रकल्पाची तुलना दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाशी करत आहेत. अनेक वर्षे घोषणांमध्ये राहिलेल्या योजनांप्रमाणेच या प्रकल्पालाही विलंब होणार का, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष प्रगती किती?..
भूमिपूजनावेळी प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला होता. मात्र सध्या नदीतील जलपर्णी, सुरू असलेली अपूर्ण कामे आणि प्रकल्पाच्या गतीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे नागरिकांकडून अधिक स्पष्ट माहितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “विकासाची कामे प्रत्यक्षात दिसली पाहिजेत,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांकडून उपस्थित केले जात असलेले प्रश्न
स्थानिक पातळीवर नागरिकांकडून काही प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत ..
१०२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे?
जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागणार?
प्रकल्पाच्या विलंबामागील प्रमुख अडचणी कोणत्या आहेत?
नदीतील वाढत्या जलपर्णीवर नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना केली जाणार?..
१५ दिवसांत काम पूर्ण करण्याच्या निर्देशांचे काय?..
जलपर्यटन प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे विशेष बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्रालयातील सभा दालनात प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्या टप्प्याचे काम १५ दिवसांत पूर्ण करून प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणेला दिल्याची माहिती आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील १० गावांचे सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र या निर्देशांनंतरही प्रकल्पाच्या प्रत्यक्ष प्रगतीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
