भंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या प्रचंड रिक्त पदांमुळे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण शिक्षण व्यवस्था अक्षरशः ढासळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यात तब्बल ७३७ शिक्षकांची पदे रिक्त असून, धक्कादायक बाब म्हणजे ५० प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले असून, त्यांच्या भविष्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

शिक्षकांशिवाय शिक्षणाचा गाडा कसा चालणार?

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी टाकण्यात आली आहे, तर अनेक शाळा शिक्षकांविना सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षणाचा हक्क कायदा अस्तित्वात असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून ग्रामीण विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गरीब कुटुंबांच्या मुलांचे भविष्य धोक्यात

मागील दोन ते तीन वर्षांपासून रिक्त पदे न भरल्याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसत आहे. खासगी शाळांची भरमसाट फी परवडत नसल्याने या कुटुंबांचा एकमेव आधार जिल्हा परिषद शाळाच आहेत. मात्र शाळेत शिक्षकच नसतील, तर मुलांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

ग्रामस्थांमध्ये संताप; आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शिक्षणाच्या या गंभीर प्रश्नावर पालक आणि ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आहे. काही ठिकाणी शाळा बंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. प्रवेशोत्सव, विविध जनजागृती कार्यक्रम, रॅली आणि सरकारी उपक्रमांवर भर देण्यापेक्षा प्रत्येक शाळेत पुरेशा शिक्षकांची नियुक्ती करणे हीच खरी शिक्षण सुधारण्याची दिशा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज; मग शिक्षक भरतीत दिरंगाई का?

याप्रकरणी सर्वात मोठा प्रश्न राज्य सरकार आणि प्रशासनासमोर उभा राहतो. निवडणुका जाहीर होताच काही दिवसांत संपूर्ण शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागते. हजारो कर्मचारी नियुक्त केले जातात, कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो आणि संपूर्ण यंत्रणा सक्षमपणे उभी राहते. मग हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना शिक्षक भरतीसाठी हीच तत्परता आणि इच्छाशक्ती का दिसून येत नाही? शिक्षण हा शासनाच्या प्राधान्यक्रमात आहे की केवळ घोषणांपुरताच मर्यादित आहे, असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.

केवळ आकडा नाही; हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न

भंडारा जिल्यातील ७३७ रिक्त शिक्षक पदे हा केवळ प्रशासकीय आकडा नसून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडित गंभीर विषय आहे. वेळेत भरती प्रक्रिया न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अधिक वाढेल, शाळांमधील पटसंख्या घटेल आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणखी कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आता आश्वासन नव्हे, कृतीची गरज

शिक्षण हा कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा पाया मानला जातो. मात्र शिक्षकांविना शाळा चालवून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विकसित भारत किंवा ज्ञानसमृद्ध समाजाची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे रिक्त शिक्षक पदे तातडीने भरून प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम शिक्षक उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. आता राज्य सरकार केवळ आश्वासनांची मालिका सुरू ठेवणार की प्रत्यक्ष शिक्षक भरती करून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला आधार देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.