नागपूर : काही दिवसांपूर्वी दीक्षाभूमीवर गोंधळ उडाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरेई ससाई यांनी भेटण्यासाठी आलेल्या महिलांवर हात उगारल्याचे चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. त्यानंतर भंते विरोधात कारवाई करण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली होती. भंते ससाई यांनी दीक्षाभूमी येथील विहारात वास्तव्यास असलेल्या भंतेंनाही गुंडाकडून धक्कामुक्की करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. तर भंते ससाई यांनी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी कट रचल्याचा आरोप केला होता.

आता दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात घडलेल्या बेकायदेशीर कृत्यासाठी विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, भैय्याजी खैरकर यांच्यासह संबंधितांवर १५ जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी केली असून गुरुवारी बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार सुद्धा केली. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघणार असल्याचे दिसते.

डॉ.. आंबेडकर महाविद्यालयात ११ फेब्रुवारीला चौकशी पथक गेले होते. काही मंडळींनी गोंधळ घातला. यावेळी बारावी बोर्डाच्या परीक्षेत व्यत्यय आला. भंतेशी गैरवर्तन करण्यात आले. हा गंभीर प्रकार आहे. हा सर्व प्रकार स्मारक समितीतील काही सदस्य, काही बाहरेची मंडळी आणि महिलांमुळे घडला असल्याची तक्रार डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य दीपा पान्हेकर यांनी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते ससाई यांच्याकडे केली. त्या पार्श्वभूमीवर भंते ससाई यांनी गुरुवारी बजाज नगर पोलिसांकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथील प्राचार्यांकडून मला गेल्या ११ फेब्रुवारी रोजी घडलेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने या बैकायदेशीर कृत्यासाठी विलास गजघाटे, डाॅ. प्रदीप आगलावे, भुवनेश्वरी मेहरे, अर्चना मेश्राम, डॉ. नितीन कोंगरे, भैय्याजी खैरकर, शरद मेश्राम, हेमंत नागरे, उज्वला गणवीर, ज्योती आवळे, रमा वासनिक, रंजना वासे, सविता धामगये, परिता झोडापे व कुंदा पाटील जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.