बुलढाणा : बुलढाणा : देशाचा ‘राजा’ कायम राहील, पण तो तणावात राहील. देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील. देशाला युद्धजन्य स्थितीचा धोका राहणार आहे. यंदा पीकपाण्याची स्थिती देखील फारशी अनुकूल राहणार नाही, हे भाकीत आहे भेंडवळच्या घटमांडणीचे.
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ (ता. जळगाव जामोद ) येथील घटमांडणीचे भाकीत आज सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आले. हे भाकीत ऐकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच कृषी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने हजर होते. चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी विविध क्षेत्रांशी संबंधित ही भाकिते जाहीर केली.
संरक्षण खात्यावर ताण
यावर्षी पीक-पाण्याची स्थिती फारशी आशादायक नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे प्रतिबिंब यंदाच्या भाकीतमध्ये उमटले. देशाचा राजा कायम राहणार असला तरी तो कायम तणावात राहील. तसेच युद्धजन्य स्थितीमुळे देशाच्या संरक्षण खात्यावर ताण राहील. यावर्षी देशाची आर्थिक स्थिती बिकट राहणार आहे,असे भाकीत यावेळी महाराजांनी वर्तविले.
जुलैपासून दमदार पाऊस
यावर्षी पिकांची भरपूर प्रमाणात नासाडी दर्शवण्यात आली असून पिकांवर रोगराईचे प्रमाणही अधिक दाखवण्यात आले आहे. याचबरोबर मोसमी पावसाच्या (मान्सून) पहिल्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडेल. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सार्वत्रिक जोरदार पाऊस कोसळणार आहे. मात्र, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा धोका असल्याचे सारंगधर व पुंजाजी महाराज यांनी सांगितले. याचबरोबर पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून या नुकसानीमुळे देशाला आर्थिक फटका सहन करावा लागेल. यामुळे देशाची अर्थव्यवस्थासुद्धा कमकुवत राहील. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि महापूर, यांमुळे पृथ्वीला धोका निर्माण होणार असून प्रचंड नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
पीकनिहाय भाकीत
यावेळी खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे भाकीतसुद्धा वर्तविण्यात आले. कापूस, ज्वारी, तीळ ही पिके चांगली राहणार असून त्यांना भावदेखील चांगला मिळेल. बाजरी, तूर, उडीद ही पिके साधारण राहणार आहे. मुगाच्या भावात तेजी राहील, गहू पीक चांगले राहणार असून हरभरा साधारण राहील. मात्र रोगराई आणि अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी नासाडी होणार, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश येथूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी, कृषी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते.
‘ते तर दलालच…’
भेंडवळच्या भाकितावर दरवर्षी टीका होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)सारख्या संस्था याला वैज्ञानिक आधार नसल्याचा आरोप करतात. यावर विचारले असता, या भाकितांना शास्त्रीय आधार असल्याचे महाराजांनी सांगितले. पाश्चिमात्य देशांचे हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीवर हल्ले होत आहे. हा त्याचाच एक भाग आहे. असे आरोप करणारे पाश्चिमात्य देशांचे दलाल असल्याचे महाराजांनी सांगितले.
