अमरावती : मध्य प्रदेश भूदान यज्ञ कायदा, १९५३ मधील कलम २५ नुसार शर्तभंग झालेल्या भूदान जमिनीला सरकारजमा करण्याच्या तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून, संबंधित सरकारजमा झालेली भूदान जमीन वाटप करण्यास महसूल अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच, कायद्याच्या वैधतेचा मुद्दा असल्याने महाधिवक्त्यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.
विदर्भ भूदान यज्ञ मंडळाचे अधिकृत प्रतिनिधी नरेंद्रसिंग बैस यांनी महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव आणि इतरांविरोधात ही रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. राहुल भांगडे आणि ॲड. तेजस बैस यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मध्य प्रदेश भूदान यज्ञ कायद्याच्या कलम २५ नुसार, जर भूदान मंडळाने एखाद्या भूमिहीनाला जमीन वाटप केली आणि संबंधिताकडून काही अटींचा भंग झाला, तर त्याचा वाहितीचा अधिकार संपुष्टात आणून ती जमीन पुनर्वाटपासाठी भूदान मंडळाकडे वर्ग होण्याऐवजी ती सरकारजमा केली जाते. याचिकाकर्त्यांनुसार, ही तरतूद कायद्याच्या मूळ हेतू व उद्दिष्टांशी विसंगत असून वरकरणी असंवैधानिक आहे. ही तरतूद कायम राहिल्यास भूदान चळवळ आणि कायद्याचा मूळ उद्देशच निष्फळ ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. या तरतुदीचा वापर भूदान जमीन सरकारजमा करण्यासाठी होत असून त्या माध्यमातून भूदानची ओळखच पुसून जाईल, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. शर्तभंगातून सरकारजमा झालेली जमीन महसूल प्रशासनाकडून सरकारी उपक्रमांसाठी वाटप करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला याचिकाकर्त्यांनी हरकत घेतली आहे. न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल अधिकाऱ्यांना ही जमीन वाटप करण्यास मनाई केली आहे.
पुढील सुनावणी २ डिसेंबरला
खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद लक्षात घेऊन प्रतिवादींना २ डिसेंबर २०२६ पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तोपर्यंत महसूल प्रशासनाने सरकारजमा झालेली भूदान जमीन वाटप करू नये, असा स्पष्ट अंतरीम आदेश न्यायालयाने दिला आहे. शासनाच्या वतीने साहाय्यक सरकारी वकील एन. एस. औतकार यांनी नोटीस स्वीकारली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड राहुल भांगडे, ॲड आदर्श बाहेती, ॲड निनाद लांडे, ॲड भानूप्रताप ओझा, ॲड छगन ठाकरे, ॲड तेजस बैस हे बाजू मांडत आहेत.
