गडचिरोली : आम्ही १९७० च्या दशकात सामाजिक शोषणाविरोधात पेटून उठलो. १९४६-५१ च्या तेलंगणा सशस्त्र लढ्याची शिदोरी सोबत होती. आमचा लढा हा पोलिसांसोबत नव्हता, तो व्यवस्थेच्या विरोधात होता. मात्र, आज काळ बदलला आहे. शस्त्रांच्या जोरावर परिवर्तन घडवणे आता शक्य नाही, हे ओळखूनच मी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.
समाजात शोषण असेल तरच लोक क्रांतीकडे वळतात. त्यामुळे समाजाला नक्षलवादाची गरजच भासू नये, याचे भान आता व्यवस्थेने ठेवले पाहिजे, असे माजी सर्वोच्च नक्षल नेता सोनू उर्फ भूपती याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
भूपती म्हणाला, २०१३ पासून गडचिरोलीतून संघटनेत नवीन भरती झालेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही जनतेपासून लांब गेलो. जेव्हा संघटना जनतेपासून तुटते, तेव्हा तिचा अंत निश्चित असतो. मी नोव्हेंबर २०२४ मध्ये संघटनेच्या नेत्यांसमोर ज्यात गणपती, बसवराजू आणि देवजी उपस्थित होते, माझे स्पष्ट मत मांडले की, आता शस्त्रांसह काम करणे अशक्य आहे. तेव्हा अनेकांनी मला चुकीचे ठरवले होते. तर काहींनी सहमती दर्शवली होती.
देशातील परिस्थितीचा विचार करूनच मी या निष्कर्षापर्यंत आलो होतो. हतबल होऊन डोळ्यासमोर एक-एक सदस्यांना मरताना बघण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नव्हता. म्हणूनच मी पोलिसांपुढे शरण येण्याचा निर्णय घेतला. गेली ४३ वर्ष मध्य प्रांतातील जंगलात काढले. त्यामुळे पंधरा वर्षांनंतर मी पहिल्यांदा वीज (लाईट) पाहिली, यावरून तुम्ही आमच्या विजनवासाची कल्पना करू शकता, असेही तो म्हणतो.
हिडमाचे योगदान मोठेच, मिलिंद माझा जवळचा मित्र
नक्षल चळवळीतील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ‘हिडमा’बद्दल बोलताना भूपती म्हणाला, हिडमाला सोशल मीडियामुळे तरुण पिढीने डोक्यावर घेतले आहे. त्याच्या विचारधारेवर चालून कोणी काम केलेले नाही. संघटनेत त्याचे कर्तृत्व मोठेच होते. एप्रिल २०२५ मध्ये बसवराजू देखील मुख्य प्रवाहात येण्यास तयार होता. पण नंतर त्यांने निर्णय बदलला आणि चकमकीत ठार झाला.
२००८ ते २०२१ पर्यंत मी मिलिंद तेलतुंबडेसोबत काम केले. तो माझा चांगला मित्र होता. पण त्यालाही जीव गमवावा लागला. हरित वरिष्ठ सदस्य व गणपतीही खूप आजारी आहे. ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघता नक्षल चळवळ अपयश ठरली, हे मान्य करायला हवे. हतरीहीही काहीजण मुख्य प्रवाहात येण्यास अद्याप तयार नाही. आजच्या परिस्थितीत सशस्त्र क्रांती शक्य नाही. हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे उर्वरित सदस्यांनी देखील मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, असे आवाहनही भूपती याने केले.
‘सीए’ बनायचे होते पण..
तेलंगणातील पेदापल्ली येथील ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला आणि स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असलेल्या भूपतीला ‘सीए’ बनायचे होते. मात्र, सामाजिक परिस्थिती आणि घरातील संघर्षाचा वारसा त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे मी विद्यार्थी चळवळीत सामील झालो. त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही, असे तो म्हणतो.
२४ जानेवारी १९८३ रोजी घर सोडल्यानंतर तो कधीही परतला नाही. माझी पत्नी २६ ऑक्टोबर १९८६ ला संघटनेत आली. अहेरी तालुक्यातील एका गावात आमची पाहिली भेट झाली आणि विचारांच्या साम्यातून आम्ही १९८७ ला लग्न केले. ती आजारी असल्याने तिला आधीच मुख्य प्रवाहात पाठवले होते.
सहकाऱ्यांना गमावणे सोपे नसते, मी त्या काळात कमालीचा हतबल होतो, असे तो भावूक होऊन सांगतो. वडिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात संघर्ष केलेले होते. त्यामुळे मी आणि माझा भाऊ दोघांनी घेतलेला निर्णय बद्दल त्यांना फारसा आक्षेप नव्हता. पण आई खूप भावनिक झालेली होती. भाऊ किशनजी आणि माझे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. तो माझा ‘हिरो’ होता, असे भूपती म्हणाला.
मी नास्तिक, जंगलात सापही खाल्ले
चार दशके जंगलात काढणे सोपे नव्हते. ब्राह्मण कुटुंबातून असल्यामुळे घरी सर्व शाकाहारी होतो. पण चळवळीत असताना जंगलात मुंग्यांपासून सापांपर्यंत सर्व काही खाल्ले.मी नास्तिक असल्यामुळे मी कधी कुठल्याही जाती धर्माबद्दल कधीच विचार केला नाही. मी राजकीय विचार सोडलेला नाही, फक्त शस्त्र सोडले आहे. मुख्य प्रवाहात येऊन मला थोडाच काळ झालेला आहे. त्यामुळे देशातील एकंदरीत सामाजिक व राजकीय परिस्थिती समजून घ्यायला वेळ लागेल. मी त्याबद्दल अभ्यास करतो आहे. त्यामुळे भविष्याबद्दल लगेच बोलणे योग्य होणार नाही.
जंगलात कादंबरी व साहित्याचे लिखाण
४३ वर्ष जंगलात भटकत असताना भूपती जगातील घडामोडीवरही लक्ष ठेवायचा. वृत्तपत्र व पुस्तक वाचनाचा त्याला छंद आहे. यादरम्यान त्याने ‘ये जंगल हमारा’, ‘रागो’ ‘दंडकारण्यातील महिलांचा इतिहास’ अशी पुस्तके लिहिली आहे. सोबतच अशाप्रकारच्या साहित्यातून तो आपला अनुभव देखील मांडत आला आहे. यावर तो म्हणाला, चळवळीचे नेतृत्व करताना जगात काय सुरू आहे. याची माहिती असणे गरजेचे होते. म्हणून मी नवीन तंत्रज्ञान, पुस्तक आदींचा वापर करायचो. गरज पडेल तेव्हा संगणकापासून मोबाईल पर्यंत सर्वच वापरले आहे.

