नागपूर: माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याने आता वादाला तोंड फुटले होते. भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते, याचा आपल्याला प्रचंड धक्का बसला. यापुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नये, अशा शब्दात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावर टीका केली. यानंतर आता या वादात भूषण गवई यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई उतरले आहेत. त्यांनी श्याम मानव यांचा समाचार घेत, प्रत्येकच आंबेडकरी नेता गणपती, हनुमानाच्या मंदिरात गेल्याचे भाष्य केले आहे

प्रकरण काय आहे?

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली होती. या भेटीचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भूषण गवई यांच्यावर टीका केली होती. भूषण गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते, याचा मला प्रचंड धक्का बसला आहे असे विधान केले होते.

श्याम मानव यांनी काय टीका केली?

श्याम मानव यांनी म्हटले होते की, भूषण गवई हे रासू गवई यांचे सुपुत्र आहेत, यापूर्वी विकृत बाबांचा सत्कार दीक्षाभूमीवर घेतला त्यावेळेस मी विरोध केला होता. भूषण गवई म्हणतात की मी स्वतः आंबेडकरी विचाराचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध पिलो आहे पण तो माणूस जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असेल तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचे नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे.

नेमके काय म्हणाले राजेंद्र गवई ?

भूषण गवई बागेश्वर धामला गेल्याने टीका होत आहे. परंतु प्रत्येक आंबेडकरी नेता  हा गणपती मंदिर, हनुमान मंदिर, चर्च, मज्जिद मध्ये गेलेला आहे. समाजात राहत असताना मित्रांच्या आग्रहाखातर कधी कधी जावे लागते. पण मी त्याबद्दल बोलत नाही भूषणजी त्यावर बोलतील. मी श्याम मानव यांना आव्हान देतो की, भूषणजींना नंतर रोखा आधी हिंमत असेल तर मला रोखा. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी एकटा निशस्त्र येईल. तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझा आव्हान स्वीकारा, असे आवाहनच राजेंद्र गवई यांनी केले.